मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील धक्कादायक पराभवानंतर भारतीय संघाच्या नेतृत्वात बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोहलीकडे कसोटीचे तर हिटमॅन रोहित शर्माकडे मर्यादित षटकांच्या सामन्यांचे नेतृत्व सोपवण्यात यावे, अशी मागणी आहे. पण, असे पर्याय भारतात कामी येत नसल्याचीही चर्चा आहे. बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक रविवारी होणार आहे आणि त्यात याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात विविध फॉरमॅटमध्ये विविध कर्णधार आहेत. पण, भारतात कर्णधार विभागणीचा पर्याय चाललेला नाही. भारतात नोव्हेंबर 2007 ते ऑक्टोबर 2008 आणि जानेवारी 2015 ते जानावीर 2017 या कालावधीत कर्णधार विभागणी करण्यात आली होती, परंतु त्याला फार यश मिळालेले नाही. वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. रोहितकडे नेतृत्व सोपवावं अशीही मागणी होत आहे.
पण, सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडेच राहणार आहे. कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 संघाची धुरा ही कोहलीच्याच खांद्यावर ठेवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. रविवारी होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीत त्याची अधिकृत माहिती दिली जाईल. "रविवारी सर्व अफवांना पूर्णविराम दिला जाईल,'' असे सूत्रांनी सांगितले.
भारतीय संघ आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात दोन कसोटी, तीन ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामने खेळवण्यात येतील. गतवर्षी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा गेला होता.
प्रशिक्षक निवड प्रक्रियेत कोहलीच्या मताला किंमत नसणार भारताच्या मुख्य प्रशिक्षकासह अनेक पदांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) अर्ज मागवले आहेत. भारताचा नवा प्रशिक्षक कोण असेल याचा निर्णय कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय सल्लागार समिती घेणार आहे. त्यामुळे यंदा प्रशिक्षक निवड प्रक्रियेत कर्णधार विराट कोहलीचे मत घेतले जाणार नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अनिल कुंबळे यांच्या कार्यकाळात जे घडले त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.