नवी दिल्ली : ‘मायदेशात होणाऱ्या सामन्यांमध्ये उपकर्णधार नसावा, त्यामुळे सर्वोत्तम अंतिम ११ निवडण्यात अडचणी येतात. आता उरलेल्या दोन कसोटी सामन्यांसाठी शुभमन गिल याला लोकेश राहुल याच्या जागी संघात घ्यायला हवे’, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
शास्त्री यांनी आयसीसीच्या रिव्ह्यू पॉडकास्टमध्ये म्हटले की, ‘संघ व्यवस्थापनला राहुलच्या फॉर्मबाबत माहिती आहे. त्याच्या मानसिकतेबाबत समजते. त्यामुळे आता गिलला संधी मिळायला हवी. भारतात खेळताना उपकर्णधार नियुक्त करायला नको, त्यामुळे सर्वोत्तम अंतिम ११ चा संघ निवडण्यात अडचणी येतात. जर काही कारणाने कर्णधार मैदान सोडत असेल तर त्याऐवजी त्याच्या अनुपस्थितीत दुसऱ्या खेळाडूला जबाबदारी देता येते. मात्र, उपकर्णधार नियुक्त केल्याने समस्या निर्माण होतात. राहुल पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपकर्णधार होता. मात्र, त्यामुळे अंतिम ११ मध्ये कायम होता.’
आता त्याला उपकर्णधार पदावरून दूर करण्यात आले आहे. परदेशात सामने असताना मात्र परिस्थिती वेगळी असते.’
‘राहुल एक जबरदस्त खेळाडू आहे. मात्र, त्याला सातत्याने चांगला खेळ करत राहावे लागेल. भारतात गुणवत्तेची कमतरता नाही. अनेक खेळाडू संघात जागा मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत. अशात मधल्या फळीत आणि गोलंदाजीत अनेक पर्याय आहेत. मजबूत होऊनच सर्वांना आपली जागा मिळवावी लागते.’ते पुढे म्हणाले की, ‘आपल्या कार्यकाळात पुजाराला संघातून बाहेर केले होते. त्याने शतकासोबतच पुनरागमन केले. राहुललाही संघातून बाहेर केले होते. त्यानेही शानदार पुनरागमन केले. टी२० प्रारूपातील लय कसोटी क्रिकेटमध्ये घेऊन जाऊ शकत नाही.’