Join us  

ना विराट, ना रोहित; वसिम अक्रमने 'या' फलंदाजाची केली सचिन तेंडुलकरशी तुलना

अक्रमने एका युवा फलंदाजाच्या बॅटिंगचे तोंडभरून कौतुक केले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 4:38 PM

Open in App

Wasim Akram Sachin Tendulkar: भारतीय आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय व क्रिकेट संबंध अद्यारही तणावाचे आहेत. क्रिकेटच्या मैदानात दोन्ही देशांचे खेळाडू एकमेकांविरोधात करो या मरो च्या लढतीप्रमाणे खेळतात. इतकेच नव्हे तर निवृत्त झालेले पाकिस्तानी खेळाडूही काही वेळा भारताविरूद्ध किंवा भारतीय खेळाडूंविरोधात विचित्र विधाने करतात. शोएब अख्तर, रमीझ राझा, जावेद मियाँदाद, वसीम अक्रम हे खेळाडू अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळेच चर्चेत येतात किंवा टीकेचे धनी होतात. पण नुकतेच वसीम अक्रमने क्रिकेटशी संदर्भात एक मोठं विधान केलं आहे. त्याने सध्या भारतीय क्रिकेट संघातील एका फलंदाजाची तुलना थेट महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरशी केली आहे.

एखाद्या गोलंदाजाने फलंदाजाची स्तुती करणे ही खूप मोठी गोष्ट असते. त्यातच हा गोलंदाज महान वसिम अक्रम असेल तर त्याची बातच काही और आहे. त्यातही दुग्धशर्करा योग म्हणजे, वसिम अक्रमने या युवा फलंदाजाची तुलना थेट क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरशी केली आहे. अक्रम नक्की काय म्हणाला आणि कोणाचं नाव घेतलं, ते जाणून घेऊया. "सध्याच्या भारतीय संघातील शुबमन गिलला जर मी गोलंदाजी करत असतो, तर मला वाटते त्याला गोलंदाजी करणे म्हणजे सचिनला गोलंदाजी करणे असंच आहे. शुबमन गिलला टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करायची म्हणजे सचिनला वन डे च्या पहिल्या १० षटकात गोलंदाजी करण्यासारखं आहे. कारण त्या वेळेत ३० यार्डच्या सर्कलबाहेर केवळ दोनच फिल्डर असतात. त्यामुळे फलंदाज गोलंदाजाची यथेच्छ धुलाई करतात," असे वसीम अक्रम म्हणाला.

"मी जेव्हा जयसूर्या किंवा कालुवितरणाला गोलंदाजी करायचो तेव्हा मला माहिती होती की मला त्यांना बाद करण्याची संधी आहे. मी त्यांना मधल्या वेळेत बाद करण्याची शक्कल लढवायचो. कारण ते प्रत्येकच चेंडू मारायचा प्रयत्न करायचे. पण सचिन किंवा गिलसारखे खेळाडू हे फार वेगळे असतात. ते फलंदाजी करताना तंत्रशुद्धच खेळतात. गिल हा असा खेळाडू आहे जो तिनही प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये भरपूर धावा करू शकतो. तो केवळ भारतीय संघाचाच नव्हे तर विश्व क्रिकेटचा भविष्यातील सुपरस्टार आहे," असेही अक्रम म्हणाला.

टॅग्स :सचिन तेंडुलकरवसीम अक्रमशुभमन गिलविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App