भारतीय संघाची आजपासून श्रीलंकेशी टी२० मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज लखनौमध्ये आहे. तर दुसरा आणि तिसरा सामना धर्मशालाच्या मैदानावर २६ आणि २७ फ्रेब्रुवारी अशा सलग दोन दिवशी होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या मालिकेसाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने विराट कोहली आणि ऋषभ पंत या दोन अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे. तशातच भारताचा गेल्या मालिकेचा हिरो सूर्यकुमार यादव, उपकर्णधार लोकेश राहुल आणि स्विंग गोलंदाज दीपक चहर हे तिघेही दुखापतग्रस्त असल्याने मालिकेला मुकणार आहेत. अशा परिस्थितीत भारताचं Playing XI कसं असू शकतं, ते पाहूया.
भारताचे चार महत्त्वाचे खेळाडू जरी संघात नसले तरीही भारताकडे एक तगडा संघ आहे. श्रीलंका मालिकेत अनेक खेळाडूंना नाईलाजाने बाकावर बसवावे लागले होते. त्यांना या मालिकेत सुयोग्य संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. रोहित शर्मा आणि इशान किशन ही जोडी पुन्हा एकदा सलामीवीर म्हणून दिसू शकेल. विराट व सूर्यकुमार नसल्याने तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर तर चौथ्या क्रमांकावर दीपक हुडाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
रविंद्र जा़डेजा संघात परतला असल्याने वेंकटेश अय्यर पाचव्या क्रमांकावर तर रविंद्र जाडेजा सहाव्या क्रमांकावर खेळून फिनिशरची भूमिका पार पाडताना दिसू शकतील. सूर्याच्या अनुपस्थितीत तोडीस तोड असा जाडेजा संघात आल्याने वेंकटेश अय्यरला तो नक्कीच चांगली साथ देऊ शकेल याची साऱ्यांनाच खात्री आहे.
गोलंदाजीचा विचार केल्यास, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार हे दोघे वेगवान गोलंदाजीची आघाडी समर्थपणे सांभाळू शकतात. त्यांना साथ देण्यासाठी संघात मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेलला संघात स्थान मिळू शकते. हर्षल पटेल दडपणाच्या वेळी संघाला विजय मिळवून देण्यात पटाईत असल्याचं आपण पाहिलंच आहे. पण लखनौच्या खेळपट्टीवर फिरकीला पोषक वातावरण असल्याने युजवेंद्र चहलसोबत रवि बिश्नोईलाही संधी देण्यात आल्यास आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नसेल.
असं असू शकतं भारतीय संघाचं Playing XI - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, दीपक हुडा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई किंवा मोहम्मद सिराज
बाकावरील खेळाडू - ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, आवेश खान, कुलदीप यादव