पाकिस्तान क्रिकेट मंडळानं (पीसीबी) काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) इशारा दिला होता. जर आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानात येणार नसेल, तर पाकिस्तान संघ 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेईल, असा इशारा पीसीबीनं दिला होता. पण, अवघ्या काही तासांत पीसीबीनं घुमजाव करत तो इशारा किती पोकळ होता, हे स्वतः सिद्ध केले. पण, बीसीसीआयनं पाकला जशासतसे उत्तर दिले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या मैदानाबाहेरची सामना रंगला आहे. त्यामुळे आशियाई क्रिकेट परिषद संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
BCCIला इशारा देणाऱ्या पाकिस्तानचे घुमजाव; आता विचारतात असं कधी म्हणालो?
यंदाचा आशिया कप हा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पण, शेजारील राष्ट्राशी संबंध पाहता टीम इंडिया पाकमध्ये जाणार नाही, हेही जवळपास निश्चित आहे. त्यामुळे भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा विचार आशिया क्रिकेट परिषद करत आहे. पण, पीसीबीकडून मिळत असलेल्या पोकळ इशाऱ्यांना अखेर बीसीसीआयकडून उत्तर मिळालं. 2013 पासून दोन्ही देशांमध्ये द्विदेशीय मालिका झालेली नाही. उभय संघ आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड कप आणि आशिया कप स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात. 2018मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे आशिया कप खेळवण्यात आला होता.
पुढील आशिया कप पाकिस्तानमध्ये होणार असल्याचे ठरले होते. त्यावरून बीसीसीआयनं पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली. भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यताच नाही, असे स्पष्ट मत बीसीसीआयनं व्यक्त केले. ''पीसीबी या स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे, हा आमच्यासाठी मुद्दाच नाही. आम्ही तटस्थ ठिकाणी खेळणार हे आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे पाकिस्तानात आमचा संघ पाठवण्याचा संबंधच येत नाही,'' असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले.