वेलिंग्टन : इंग्लंडविरुद्ध विश्वकप अंतिम लढतीत नाट्यमय पद्धतीने पत्कराव्या लागलेल्या पराभवातून सावरण्यासाठी प्रयत्नशील असलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने मंगळवारी म्हटले की, फायनलमध्ये कुणीच पराभूत झाले नाही.’ आजी-माजी क्रिकेटपटूंनी न्यूझीलंडबाबत सहानुभूती व्यक्त केली. निर्धारित वेळेत व सुपर ओव्हरमध्ये स्कोअर बरोबरीत राहिल्यानंतर चौकार-षट्कारांच्या संख्येच्या आधारावर इंग्लंडला विजेता जाहीर करण्यात आले. त्यानंतर क्रिकेट जगतात ‘हास्यास्पद’ नियमाची समीक्षा करण्याची मागणी होत आहे.
विलियम्सन म्हणाला, ‘अखेर कुणीच अंतिम लढतीत पराभूत झाला नाही, पण शेवटी चषक तर एका संघाला द्यायचाच होता.’ पराभव स्वीकारण्यासाठी सर्वत्र विलियम्सन व त्याच्या संघाची प्रशंसा होत आहे. स्पर्धेच्या नियमांची सर्वांना पूर्वीच कल्पना होती, असे विलियम्सन म्हणाला.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत विलियम्सनला या नियमाबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘पत्रकार परिषदेत असे प्रश्नही विचारले जातील, याचा कधी विचारही केला नव्हता. हे स्वीकारणे कठीण आहे. कारण दोन्ही संघांनी या क्षणासाठी मोठी मेहनत घेतली होती. दोन प्रयत्नानंतरही विजेता निश्चित होऊ शकला नाही. यानंतर ज्या पद्धतीने विजेता निश्चित झाला, तशी नक्कीच कुठल्याही संघाची इच्छा नसेल.’
दरम्यान, न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, मी खूपच निराश आहे. शंभर षटकांनंतरही धावसंख्या बरोबरीत राहिल्यानंतर आमचा पराभव झाला. मात्र, ही खेळाची तांत्रिक बाजू आहे. मला माहीत आहे की जेव्हा हे नियम लिहिले गेले, तेव्हा कधी अशीही स्थिती निर्माण होईल याचा विचारही केला नसेल.’
>२०२३ मध्ये विश्वविजेतेपदासाठी
खेळेल न्यूझीलंड - व्हिटोरी
लंडन : न्यूझीलंडचा दिग्गज फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी याने न्यूझीलंडच्या खेळाडूंना पराभवाने निराश न होता भविष्याचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्याने आशा व्यक्त केली आहे की, किवी संघ विश्वचषक २०२३ मध्ये विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने उतरेल. न्यूझीलंडला सामना आणि सुपर ओव्हर टाय झाल्यावर बाऊंड्रीच्या नियमाने विश्वचषक गमवावा लागला. व्हेटोरी याने लिहिले की, ‘हे खेळाडू खूप अनुभव घेऊन पुढे जातील. मला असे कोणतेच कारण वाटत नाही, ज्यामुळे हा संघ भारतात होणाऱ्या विश्वचषक खेळू शकणार नाही. केन विल्यम्सनच्या नेतृत्वातील संघाला त्यांच्या शानदार प्रदर्शनावर अभिमान बाळगायला हवा. न्यूझीलंडचे खेळाडू निराश होणार नाहीत. त्यांनी विश्वचषक अंतिम फेरीत जसा खेळ केला, त्यावर त्यांना नेहमीच अभिमान हवा.’
>नियम आहे तो आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासून तो नियम आहे. अशी लढत होईल, याचा कुणी विचारही केला नव्हता. लढत शानदार झाली आणि सर्वांनी याचा आनंद घेतला.
- केन विलियम्सन,
कर्णधार, न्यूझीलंड
Web Title: Nobody lost in the final - Williamson
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.