मुंबई, दि. 26 - नुकत्याच आटोपलेल्या महिला क्रिकेट विश्वचषकात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाला अंतिम लढतीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र विश्वचषक जिंकता आला नसला तरी या रणरागिणींनी भारतीय क्रिकेट प्रेमींचे मन मात्र जिंकण्यात यश मिळवले. त्यामुळेच आज पहाटे मायदेशी परतलेल्या या खेळाडूंच्या स्वागतासाठी विमानतळावर क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या अभूतपूर्व स्वागताने भारतीय संघातील महिला खेळाडू भारावून गेल्या आहेत. अशा स्वागताचा आमच्या पैकी कुणालाच अनुभव नव्हता. क्रीडाक्षेत्रात महिलांची कामगिरी उंचावत आहे हे सुचिन्ह आहे. त्याचा आनंद व्यक्त व्हायलाच हवा, असे क्रिकेटप्रेमींनी केलेल्या स्वागतामुळे भारावलेली भारताची कर्णधार मिताली राज म्हणाली. मायदेशात परतल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मिताली म्हणाली." महिला क्रिकेटच्या परिस्थितीत बदल होणे आवश्यक होते. महिला क्रिकेटबाबत लोकांना फार माहिती नव्हती, मात्र आमच्या कामगिरीमुळे त्यांच्यापर्यंत महिला क्रिकेट पोहोचले. मिताली राजच्या नेतृत्वाखाली जबरदस्त कामगिरी करत भारतीय महिला संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र इंग्लंडविरुद्ध झालेल्या अंतिम लढतीत हातातोंडाशी आलेला विश्वचषक विजय भारतीय संघाच्या हातून निसटला होता. तळाच्या फलंदाजांनी निराशा केल्याने या लढतीत भारताला केवळ 9 धावांनी पराभूत व्हावे लागले होते.विश्वचषकाच्या अंतिम लढतीत महिला संघ पराभूत झाला असला तरी भारतीय क्रिकेटप्रेमींनी महिला संघाच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक केले होते. त्यामुळेच आज सकाळी संघा मायदेशी परतल्यावर त्यांच्या स्वागतासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. "आज क्रिकेटप्रेमींनी केलेल्या स्वागतासारख्या स्वागताचा आमच्यापैकी कुणालाच अनुभव नव्हता. क्रीडाक्षेत्रात महिलांची कामगिरी उंचावत आहे हे सुचिन्ह आहे. त्याचा आनंद व्यक्त व्हायलाच हवा,"असे मिताली राज म्हणाली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- अशा स्वागताचा अनुभव नव्हता, जोरदार स्वागताने मिताली राज भारावली
अशा स्वागताचा अनुभव नव्हता, जोरदार स्वागताने मिताली राज भारावली
आज पहाटे मायदेशी परतलेल्या महिला क्रिकेट संघातील खेळाडूंच्या स्वागतासाठी विमानतळावर क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या अभूतपूर्व स्वागताने भारतीय संघातील महिला खेळाडू भारावून गेल्या आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 12:26 PM