मुंबई : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सचिनचा पहिलाच दौरा होता तो पाकिस्तानचा. त्यावेळी सचिनचे वय होते 16 वर्षे आणि 205 दिवस. त्याचा हा पहिला दौरा म्हटला की एक किस्सा आठवल्यावाचून राहत नाही. या दौऱ्यातील अखेरच्या सामन्यात सचिनचे नाक फुटले होते, रक्त वाहत होते, पण तरीही तरी मर्द मराठा सचिन तेंडुलकरपाकिस्तानमध्ये छाती फुलवून उभा राहिला होता. नेमकं काय घडलं होतं, तुम्हाला माहिती आहे का...
पहिल्या सामन्यात सचिन 15 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर भारताची अखेरच्या सामन्यात 4 बाद 38 अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळी नवज्योतसिंग सिद्धू खेळपट्टीवर होता. सचिन फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यावेळी पाकिस्तानचे गोलंदाज आग ओकत होते. त्यावेळी वकार युनूसचा एक चेंडू सचिनच्या नाकावर आदळला. सचिनच्या नाकातून भळाभळा रक्त वाहायला सुरुवात झाली. भारताचे फिजिओ धावत धावत मैदानात आले. सिद्धूही धावत सचिनकडे गेला.
सचिनची अवस्था बिकट होती. नाकातून त्याच्या सतत रक्त वाहत होते. आता स्ट्रेचर बोलवावे लागणार आणि सचिनला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागणार, असे साऱ्यांना वाटत होते. पण त्यावेळी सचिन फक्त दोन शब्द बोलला आणि साऱ्यांनाच धक्का बसला. ते दोन शब्द होते, ' में खेलेगा'. सिद्धूने तर सचिनला पेव्हेलियनमध्ये जाऊन उपचार घेण्याचा सल्लाही दिला. पण सचिनने त्याचे काहीच ऐकले नाही. सचिन बॅटींगला उभा राहीला आणि त्यानंतरच्या चेंडूवर लगावला तो चौकार.