Join us  

सचिन, धोनीमुळे नाही तर विराट कोहलीमुळे ऑलिम्पिकमध्ये झालं क्रिकेटचं पुनरागमन, LA च्या स्पोर्ट्स डायरेक्टरनी सांगितलं कारण

Cricket In Olympics: जेव्हा २०२८ च्या लॉस एंजिलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी मुंबईत मतदान होत होतं, त्यावेळी विराट कोहलीची खूप चर्चा झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 6:09 PM

Open in App

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे चाहते जगभरात पसरले आहेत. आजचे अनेक युवा क्रिकेटपटू विराट कोहलीला त्यांचं रोल मॉडेल मानतात. सध्याच्या काळात क्रीडा क्षेत्रात विराट कोहलीचं स्थान एवढं उंचावलेलं आहे की, जेव्हा २०२८ च्या लॉस एंजिलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी मुंबईत मतदान होत होतं, त्यावेळी विराट कोहलीची खूप चर्चा झाली. त्यामुळेच क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यामागे विराट कोहलीचं महत्त्वाचं योगदान आहे, असं मानता येईल.

विराट कोहली हा सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा जगातील तिसरा क्रीडापटू आहे. ऑलिम्पिकमध्ये टी-२० क्रिकेट खेळले जाणार आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ४१ व्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये ज्या इतर खेळांचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे. त्यामध्ये स्क्वॉश, बेसबॉल/सॉफ्टबॉल, लेक्रोस आणि फ्लॅग फुटबॉल यांचा समावेश आहे.

इटलीमधील ऑलिम्पिक चॅम्पियन शूटर आणि LA28 स्पोर्ट्सचे संचालक निकोलो कॅम्प्रियानी यांनी सांगितले की, मला वाटतं इथे माझा मित्र विराट कोहली आहे. त्याचे सोशल मीडियावर तब्बल ३४० दशलक्ष फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या क्रीडापटूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा आकडा लॅब्रो जेम्स, टॉम ब्रेडी आणि टायगर वुड्स यांच्या एकूण फॉलोअर्सपेक्षा अधिक आहे. ही बाब LA28 साठी विन विन सिच्युएशन आहे.

लॉस एंजिलिस-२८ आयोजन समितीने प्रस्तावित केलेल्या ५ खेळांना समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला आयओसीच्या ९९ सदस्यांमधील मतदान करणाऱ्या केवळ २ सदस्यांनी विरोध केला. त्यानंतर आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी इतर खेळांसोबत क्रिकेटचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याची घोषणा केली. याआधी ऑलिम्पिकमध्ये केवळ एकदा क्रिकेट खेळलं गेलं होतं. १९०० मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेस करण्यात आला होता. त्यात इंग्लंडने फ्रान्सचा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं होतं. 

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघआंतरराष्ट्रीय