इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) पुन्हा एकदा कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. मेंटॉर म्हणून घरवापसी झालेल्या गौतमने आनंद व्यक्त केला आहे आणि KKR चा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा त्याचा निर्धार आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने दोन आयपीएल जेतेपदं नावावर केली होती. आता भारताचा माजी सलामीवीर मेंटॉर म्हणून संघात परतला आहे. गौतम हा असा खेळाडू आहे की तो वैयक्तिक रेकॉर्ड्सपेक्षा संघाला प्राधान्य देतो आणि त्याने अनेकदा हे मैदानावर करून दाखवले आहे. २०११च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडू गंभीरने KKR ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘greatest team man' म्हणून आश्चर्यचकित करणारं नाव जाहीर केलं.
भारतीय संघाकडून खेळताना गौतम गंभीर सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळला आणि यामध्ये महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली यांचा समावेश आहे. पण, त्याने ‘greatest team man' म्हणून नेदरलँड्सच्या फलंदाजाची निवड केली. ''जेव्हा आपण निस्वार्थीपणा बद्दल बोलतो, तेव्हा मला ४२ वर्षांत हे कधीच म्हणावेसे वाटले नाही, परंतु मी आज सांगतो. मी माझ्या कारकीर्दित खेळलेल्या सर्व खेळाडूंमध्ये निस्वार्थी खेळाडू म्हणून रायन टेन डोश्चॅट ( Ryan ten Doeschate ) याची निवड करेन. तो ग्रेटेस्ट टीम मॅन आहे. त्याच्यासाठी मी गोळी खायलाही तयार आहे, आयुष्यात मी ज्याच्यावर विश्वास ठेवेन. मी हे ठामपणे सांगू शकतो कारण २०११ मध्ये कोलकाताचा कर्णधार म्हणून माझा तो पहिलाच सामना होता.''
''आमच्याकडे चार परदेशी खेळाडू उपलब्ध होते आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रायनने दमदार कामगिरी केली होती. त्या सामन्यात आम्ही तीन परदेशी खेळाडूंसोबत खेळलो आणि रायन आमच्यासाठी पाणी आणत होता. त्याच्या चेहऱ्यावर संधी न मिळाल्याची नाराजी नव्हती. त्याने मला निस्वार्थीपणा त्याने शिकवला. रायनसारख्या खेळाडूंनी मला लिडर बनवलं,''असे गौतम गंभीर म्हणाला.
यावेळी त्याने हेही सांगितले की, मी कोलकाता नाइट रायडर्सना यशस्वी संघ बनवलं नाही, तर त्यांनी मला एक यशस्वी लिडर बनवलं.
Web Title: Not Dhoni Or Sachin, Gautam Gambhir Surprises Everyone With Pick Ryan Ten Doeschate as the ‘greatest team man'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.