- ललित झांबरे
आयपीएलमध्ये एकाच दिवसात दोन सामने 'टाय' आणि तीन सुपर ओव्हर या 1-2-3 विक्रमाची खूप चर्चा आहे. व्हायलासुध्दा हवी कारण आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. पण टी-20 क्रिकेटच्या इतिहासात असे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. टी-20 क्रिकेटमध्ये याच्याआधीसुध्दा चार वेळा एकाच दिवसात दोन-दोन टाय सामने झाले आहेत. तर याच्याआधी केवळ एकदाच एकाच दिवसात तीन सुपर ओव्हर खेळले गेले आहेत.
एकाच दिवसात दोन टाय सामन्यांचा विचार केला तर 2009 मध्ये पहिल्यांदा असे घडले. 18 फेब्रुवारी 2009 रोजी दक्षिण आफ्रिकेतल्या स्टँडर्ड बँक प्रो स्पर्धेचे दोन्ही उपांत्य सामने सुपर ओव्हरवर निकाली ठरले होते. त्यात केप कोब्राज संघाने डॉल्फिन संघावर तर ईगल्स संघाने वॉरियर्स संघावर विजय मिळवला होता. ईगल्स आणि वॉरियर्स दरम्यानचा सामना तर फक्त 97 धावा असतानाही टाय झाला होता.
यानंतर 27 आॕगस्ट 2011 रोजी इंग्लंडमध्ये फ्रेंडस् लाईफ कप स्पर्धेचे दोन्ही उपांत्य सामने सुपर ओव्हरवरच निकाली ठरले होते. त्यात लिसेस्टरशायर फाॕक्सेसने लँकेशायर लाईटनिंग संघावर तर सॉमरसेटने हॕम्पशायर रॉयल्सवर विजय मिळवला होता. याप्रकारे दोन वेळा एकाच दिवशी उपांत्य फेरीचे दोन्ही सामने टाय झाल्याचा इतिहास आहे. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2018 ला असेच घडले. या एकाच दिवशी श्रीलंकेतील एलएलसी टी-20 स्पर्धेत दोन सामने टाय झाले होते.
गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेत प्रोव्हिन्शियल कप स्पर्धेच्या दोन सामन्यात सुपर ओव्हरची गरज पडली. त्यानंतर आता आयपीएल 2020 मध्ये किंग्ज ईलेव्हनने मुंबईवर तर नाईट रायडर्सने सनरायजर्सवर एकाच दिवशी सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आहे. एकाच दिवसात तीन तीन सुपर ओव्हर खेळले जाणे कदाचित पहिल्यांदाच घडले असावे असे तुम्हाला वाटत असेल तर तेसुध्दा चूक आहे. याआधी 18 फेब्रुवारी 2009 रोजी तीन-तीन सुपर ओव्हर खेळले गेले आहेत. फरक एवढाच की त्यावेळी ते सुपर ओव्हर तीन वेगवेगळ्या सामन्यात होते आणि रविवारचे तीन सुपर ओव्हर दोनच सामन्यांतील होते.
18 फेब्रुवारी 2009 रोजी वर उल्लेख केल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतील स्टँडर्ड बँक प्रो स्पर्धेच दोन्ही सामने तर सुपर ओव्हरमध्ये गेलेच होते. योगायोगाने त्याच दिवशी न्यूझीलंडमध्ये कँटरबरी व नाॕदर्न डिस्ट्रिक्ट संघादरम्यान सामना झाला तोसुध्दा टाय झाल्यावर कँटरबरीने सुपर,ओव्हरमध्ये जिंकला होता. त्यानंतर आता आयपीएलमध्ये काल दोन सामन्यात तीन सुपर ओव्हर खेळले गेले.
किंग्ज इलेव्हन आणि मुंबईदरम्यान तर सामना टाय व सुपर ओव्हरही टाय झाले. हेसुध्दा काही पहिल्यांदाच घडलेले नाही. याच्याआधी 2014 च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स दरम्यानचा सामना असा सुपर ओव्हरनंतरही टाय'च होता पण त्यावेळी दुसरे सुपर ओव्हर खेळले गेले नव्हते. राजस्थान रॉयल्सला लोयेस्ट बाऊंड्री काऊंटवर विजयी घोषीत करण्यात आले होते.
Web Title: This is not the first time in T20 cricket that such a miracle of 'tie' and 'super over' has taken place
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.