मुंबई - भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू जयंत यादव सध्या संघाबाहेर आहे. त्यामुळे आता त्याने इंग्लिश कौंटी टीम वार्विकशायरकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कौंटीच्या सध्याच्या हंगामातील शेवटच्या टीन सामन्यांसाठी भारताचा अष्टपैलू खेळाडून जयंत यादव याला करारबद्ध केले आहे, अशी माहिती वार्विकशायरने दिली आहे. ३२ वर्षीय जयंत यादव समरसेटविरुद्ध वार्विकशायर यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियातील सहकारी खेळाडू मोहम्मद सिराज याच्यासोबत दाखल होईल. हा सामना १२ सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना जयंत यादव याने सांगितले की, हा माझा पहिला कौंटी अनुभव आहे. तसेच मी शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघात समावेश झाल्याने उत्साहित आहे. जेव्हा मला वार्विकशायरकडून खेळण्याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा मी त्याला नकार देऊ शकलो नाही. त्याने वार्विकशायरसोबतच्या काराराबाबत सांगितले की, मी वार्विकशायर कौंटी क्रिकेट क्लब आणि बीसीसीआय दोघांचेही आभार मानतो. मी पुढच्या आठवड्यात वार्विकशायर कौंटी क्रिकेट क्लब आणि बीसीसीआय दोघांचेही आभार मानतो.
जयंत यादवने पुढे सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीला कारकिर्दीतील सहावा कसोटी सामना खेळल्यानंतर हे तीन सामने मला भविष्यात अधिक संधी मिळण्यासाठी खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करतील. मी एजबेस्टनमध्ये कधीही खेळलो नाही. मात्र मी या स्टेडियमबाबत खूप काही ऐकले आहे.
या हंगामात कौंटी क्रिकेट खेळणारा जयंत यादव हा आठवा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. सध्या चेतेश्वर पुजारा, कृणाल पांड्या, उमेश यादव, नवदीप सैनी, शुभमन गिल हे इंग्लंडमध्ये खेळत आहेत.
जयंत यादवने आतापर्यंत ६४ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये १७३ बळी टिपले आहेत, तर २ हजार १९४ धावा काढल्या आहेत. भारतासाठी सहा सामन्यामध्ये यादवने २९.०६ च्या सरासरीने १६ बळी टिपले आहेत. तर ३१ च्या सरासरीने २४८ धावा काढल्या आहेत.