IPL 2024 Sourav Ganguly on Hardik Pandya Captaincy : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे पर्व हे हार्दिक पांड्यासाठी अजूनतरी काही खास गेलेले नाही. गुजरात टायटन्सला मागील दोन वर्षांत त्याने जे यश मिळवून दिले, त्यामुळेच हार्दिकला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात घेतले. हार्दिकचे संघात पुनरागमन झाले इथपर्यंत सर्व ठिक होतं, परंतु रोहित शर्माला हटवून त्याला कर्णधार बनवण्याच्या फ्रँचायझीच्या निर्णयावर चाहत्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. या रोषाचा सामना हार्दिकला प्रत्येक सामन्यात करावा लागतोय...
Blog : मुंबई इंडियन्सच्या अपयशाला हार्दिक पांड्या नव्हे तर '१२वा खेळाडू' जबाबदार! पटलं तर विचार करा
हार्दिकवर चाहते टीका करताना दिसत आहेत. यावर अनेक माजी खेळाडूंनी आपापली मत व्यक्त केली, परंतु आज दिल्ली कॅपिटल्सचा मेंटॉर आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मोठे भाष्य केले आहे.हार्दिकने नेतृत्वाची धुरा हाती घेतल्यापासून मुंबई इंडियन्सला सलग तीन सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. सनरायझर्स हैदराबादने तर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची कत्तल केली आणि आयपीएल इतिहासातील सर्वोच्च २७७ धावा उभ्या केल्या. या सामन्यात हार्दिकने ४६ धावांत १ विकेट घेतली आणि २४ धावा केल्या. वानखेडेवर राजस्थानविरुद्ध हार्दिकने सर्वाधिक ३४ धावा केल्या, परंतु तो पराभव टाळू शकला नाही. याही सामन्यात चाहत्यांनी हार्दिकला Boo केले...
मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना वानखेडेवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. त्या सामन्याच्या पूर्वसंध्येला गांगुलीला चाहत्यांच्या या वागणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, हार्दिक पांड्यासोबत चाहत्यांनी असं वागायला नको... त्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय फ्रँचायझीचा होता. त्यात त्याची काय चूक? फ्रँचायझीच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. रोहित शर्माचा क्लास वेगळा आहे. त्याची कामगिरी वेगळ्या पातळीवर झालेली आहे. पण फ्रँचायझीने कर्णधार म्हणून नियुक्त केले यात हार्दिक पंड्याचा दोष नाही.