Join us  

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत नव्हे तर ऑस्ट्रेलिया फेव्हरिट; हर्षा भोगले

इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 4:24 PM

Open in App

इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. हे अपयश मागे सोडून भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे. ऑस्ट्रेलियात 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. पण, तत्पूर्वी 21 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत ऑस्ट्रेलियातच महिलांची ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भारत नव्हे तर यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ फेव्हरिट असेल, असे मत क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केलं.

या दोन स्पर्धांच्या निमित्तानं ऑस्ट्रेलियन टुअरिझमने बुधवारी मुंबईत एक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधण्यात आला. महिला क्रिकेटलाही प्रसिद्धी मिळावी, त्यांच्या सामन्यांनाही गर्दी व्हावी, असा हर्षा भोगलेंचा आग्रह होता. यावेळी त्यांनी महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त केले. 

ते म्हणाले,'' आपण नेहमी महिला क्रिकेटची तुलना पुरुष क्रिकेटशी करतो. महिला काय क्रिकेट खेळतात, असं जेव्हा लोकं बोलायची तेव्हा चीड येते. महिला क्रिकेटच्या सामन्यात तुम्ही पुरुष क्रिकेट सामन्यांचा खेळ शोधू नका. टेनिस पाहताना तुन्ही सेरेना विल्यम्स, मारिया शारापोव्हा यांची तुलना रॉजर फेडरर, राफेल नदाल यांच्याशी करता का?''

भोगले यांनी यावेळी भारतीय महिला संघाच्या कामगिरीचे कौतुकही केलं. हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, प्रिया पुनिया, जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर आदी खेळाडूंच्या कामगिरीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले,'' पुर्वी आपल्या महिला खेळाडू फटकेबाजी करत नव्हत्या. आता तुम्ही हरमनप्रीत, स्मृती यांचा खेळ पाहा. ते बिनधास्त उत्तुंग फटके मारतात. त्यांचा आत्मविश्वास वाखाण्यजोगा आहे. महिला क्रिकेटमध्येही पॉवर गेम वाढलाय.''

ऑस्ट्रेलियात होऊ घातलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत कोण फेव्हरिट असेल, यावर भोगले म्हणाले,'' भारतात वर्ल्ड कप झाला असता तर आपण फेव्हरिट असतो. पण ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहेत. पण ऑस्ट्रेलियात भारतीय फिरकीपटू कशी कामगिरी करतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. आपल्याला जलदगती गोलंदाजाची उणीव जाणवेल. पुढील पाच वर्षांत टीम इंडियात अनेक प्रतिभावान खेळाडू येतील.''  

टॅग्स :आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020टी-20 क्रिकेटभारतीय महिला क्रिकेट संघभारतआॅस्ट्रेलिया