मतीन खान, स्पोर्ट्स हेड - सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह -‘क्रिकेट केवळ खेळ नाही तर भारतीयांचा धर्म आहे,’ असे वक्तव्य करणे अतिशयोक्तीपूर्ण ठरेल, मात्र हे सिद्ध करण्यासाठी ताजे उदाहरण देता येईल. आयपीएलदरम्यान प्रत्येक जण क्रिकेटवर चर्चा करतो. सायंकाळी टीव्हीपुढे चिकटून बसणाऱ्यांची संख्या मोठी असते. आयपीएलमध्ये जगातील दिग्गज खेळतात, त्यामुळे आपण समजू शकतो.मागच्या आठवड्यात झालेल्या रणजी करंडकाच्या अंतिम लढतीत पृथ्वी शॉ आणि रजत पाटीदार यांचा अपवाद वगळता, ओळखीची नावे नव्हती. तरीही कमाल अशी की बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पाचही दिवस प्रेक्षकांनी गर्दी केली. केवळ उपस्थिती दर्शविली नाही तर त्यांनी उत्साह आणि आनंदाने प्रत्येक चेंडूची मजा लुटली. या प्रेक्षकांमध्ये युवा आणि बालकांचा समावेश अधिक होता. सामन्यादरम्यान पाटीदार आणि आरसीबीच्या समर्थनार्थ नारेबाजी झाली. या सामन्यात कर्नाटकचा संघ नव्हता. मर्यादित षटकांचा सामना नव्हता. संपूर्ण पाच दिवस चालणारा पारंपरिक कसोटी सामन्यासारखा सामना होता. खेळाडूंचा पोशाखही पांढराच होता. इतक्या सर्व गोष्टी प्रेक्षकांना खेचून आणणाऱ्या नव्हत्या, तरीही प्रेक्षकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. आयसीसी चेअरमन ग्रेग बर्कले यांना कसोटी क्रिकेट धोक्यात असल्याची चिंता वाटते. बंगळुरूतील सामन्याचे चित्र पाहिल्यानंतर खरे तर त्यांची चिंता नाहीशी होऊ शकेल.हे असे का? कारण भारतात क्रिकेट केवळ खेळ नाही, तो धर्मदेखील आहे. हा खेळ सर्वांना एका सूत्रात बांधतो. तुम्ही कुठल्याही संघाचे प्रशंसक असाल. पण उत्कृष्ट शॉट असेल, अप्रतिम झेल असेल किंवा भेदक चेंडू असेल तेव्हा टाळ्या वाजवायला स्वत: भाग पडता. लहानशा मैदानावर क्लबस्तरावरचा सामना खेळला जात असेल तरी ये-जा करणारे शेकडो प्रेक्षक थांबून सामना पाहू लागतात. राजकारण असो वा काॅर्पोरेट मीटिंग किंवा निव्वळ चर्चा या सर्वांमध्ये क्रिकेटच्या शब्दावलींचा सर्रास वापर होतोच. उदा. गुगली, बाऊन्सर असे शब्द बोलीभाषेत हमखास वापरले जातात.बंगळुरूतील सामन्यादरम्यान शुभम शर्मा, यश दुबे, रजत पाटीदार, सरफराझ आणि कार्तिकेय आदींनी भविष्यासाठी जोरदार दावेदारी सादर केली. कामगिरीच्या बळावर स्वत:ला सिद्धही केले आहे... हम भी दरिया हैं हमें अपना हुनर मालूम है, जिस तरफ भी चल पड़ेंगे रास्ता हो जाएगा.
क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यात आमच्या दिग्गजांची भूमिका मोलाची ठरली. आनंददायी बाब म्हणजे आमची भावी पिढीही प्रतिभावान आहे. रणजी सत्रातील खेळाडूंच्या कामगिरीचा हा आढावा...