मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे. ही निवड करताना कर्णधार विराट कोहली याच्याशी कोणतीची चर्चा केली जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. कोहलीनं वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रशिक्षक निवडीत कोहलीच्या सल्ला घेणे बंधनकारक नसल्याचे सल्लागार समितीनं स्पष्ट केलं.
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यासह माजी फलंदाज व प्रशिक्षक अंशुमन गायकवाड व महिला संघाची माजी कर्णधार शांता रंगास्वामी सल्लागार समितीचे सदस्य आहेत. ही समितीच प्रशिक्षकपदाचा अंतिम निर्णय घेणार आहे. ''भारतीय संघासाठी योग्य व्यवस्थापक आणि दूरदृष्टी असलेली व्यक्ती हवी. हे दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. याशिवाय अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेतच. तांत्रिक ज्ञानही गरजेचे आहे,'' असे गायकवाड यांनी सांगितले.
सध्याच्या प्रशिक्षकांचा करार वर्ल्ड कप स्पर्धेनंतरच संपुष्टात आलेला आहे, परंतु त्यांना वेस्ट इंडिज दौऱ्यपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी सोमवारी कॅप्टन कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात कोहली म्हणाला,'' रवी शास्त्रीच प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास मला आणि संघाला आनंद होईल. क्रिकेट सल्लागार समितीनं याबाबत माझ्याकडे मत मागितलेले नाही आणि ही प्रक्रिया कशी पार पाडेल, हेही मला माहीत नाही. पण, सल्लागार समितीनं माझं मत विचारल्यास, मी त्यांच्याशी चर्चा करीन.''
सल्लागार समिती कोहलीचं मत घेणार का, या प्रश्नावर गायकवाड म्हणाले,''आम्ही महिला क्रिकेट संघासाठी प्रशिक्षक निवडला, त्यासाठी आम्ही कोणाकडून मदत घेतली नाही. त्यामुळे पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीसाठी कोणाचा सल्ला घेणे बंधनकारक नाही. बीसीसीआयवर सर्व अवलंबून आहे आणि त्यासंदर्भात बीसीसीआयसोबत चर्चाही झालेली नाही.''
Web Title: Not mandatory to take Kohli's inputs, says coach selection panel member Anshuman Gaekwad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.