दुबई: भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंग (Harbhajan singh) 12 वी पास असला तरी त्याच्या नावासमोर आता डॉक्टर लावले जाईल. फ्रान्सच्या विद्यापीठाने हरभजनला पीएचडी मानद पदवी दिली आहे.
फ्रान्सचे विद्यापीठ इकोल सुपीरियेयूरे रोबर्ट डि सोर्बोनने हरभजनला एका दीक्षांत समारंभात हा सन्मान दिला आहे. असे असले तरी हरभजन सिंग या कार्यक्रमाला जाऊ शकला नाही. दुबईमध्ये आयपीएलच्या बायोबबलमध्ये असल्याने हरभजनला जाता आले नाही. आयपीएलमध्ये हरभजन कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत आहे.
हे विद्यापीठ विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मानद डॉक्टरेट उपाधी प्रदान करतो. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनाही सन्मानीत केले जाते. पीएचडी मिळाल्यानंतर हरभजनने आनंद व्यक्त केला आहे. ''जर एखादी संस्था सन्मान देत असेल तर तुम्ही त्याचा विनम्रतेने स्वीकार करता. मला हा सन्मान मिळला कारण मी क्रिकेट खेळतो. लोकांनी त्यासाठी माझ्यावर प्रेम केले आहे.'', असे हरभजन म्हणाला.