ब्रिस्बेन : अॅडिलेडच्या पहिल्या कसोटीत मानहानिकारक पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाने ‘फिनिक्स’ भरारी घेत प्रतिष्ठेचा बॉर्डर-गावस्कर चषक पुन्हा आपल्याकडे राखला. ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटीत मंगळवारी भारताने ऑस्ट्रेलियाच्या ३२८ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करीत तीन गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला. पाचव्या दिवशी अशक्यप्राय वाटणारे लक्ष्य ऋषभ पंतच्या नाबाद ८९ धावांच्या खेळीमुळे गाठता आले. ब्रिस्बेनचा ३२ वर्षे अबाधित राहिलेला गड भारताने सर केला. दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत मिळवलेला हा विजय ऐतिहासिक आहे.
ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल, मोहम्मद सिराज, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर आणि सपोर्ट स्टाफच्या कामगिरीचे खास शैलीत कौतुक केले. शुभमन गिल, मोहम्मद सिराज, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर आणि सपोर्ट स्टाफच्या कामगिरीचे कौतुक सुरू असताना शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडत होता.
तीन मिनिटांपेक्षा अधिक वेळ केलेल्या भाषणात शास्त्री म्हणाले, ‘जे साहस, समर्पित भाव आणि संकल्प तुम्ही दाखवला तो कल्पनेपलीकडचा आहे. हा आत्मविश्वास एका रात्रीत आलेला नाही. सांघिक कामगिरीच्या बळावर तुम्ही खेळाला कुठल्या कुठे नेऊन ठेवले. आज केवळ भारत नव्हे तर अख्खे जग तुम्हाला सॅल्यूट करेल.’ नवख्या खेळाडूंनी दिलेला लढा आणि त्याला अनुभवाची जोड पाहून रवी शास्त्री प्रभावित झाले. मार्गदर्शन करताना त्यांनी प्रत्येक खेळाडूंचे मनोधैर्य वाढवले. खेळाडूंच्या कामगिरीचा लेखाजोखा त्यांनी स्वत:च्या शैलीत सादर केला. ‘तुम्ही जे केले ते कायम स्मरणात ठेवा. भरपूर आनंद घ्या,’ असे सांगताना त्यांनी ऋषभ पंत तर अप्रतिम हिरो ठरला. त्याने स्वत:ची भूमिका चोखपणे बजावली,’ या शब्दात पंतच्या कामगिरीची प्रशंसा केली. यावेळी त्यांच्याशेजारी एक व्यक्ती शांतचित्त ऐकत होती. ती व्यक्ती म्हणजे कर्णधार अजिंक्य रहाणे. शास्त्री यांनी रहाणेच्या नेतृत्व क्षमतेचे तोंडभरून कौतुक केले. आम्ही ज्या स्थितीत होतो, तेथून रहाणेच्या कल्पक नेतृत्वाने यशोशिखरावर पोहोचविल्याचा उल्लेख शास्त्री यांनी केला.
Web Title: Not only India, the whole world will salute you! Ravi Shastri increased morale and appreciated players and support staff
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.