दुखापतीमुळे बराचवेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या हार्दिक पांड्यानं शुक्रवारी डी. वाय पाटील ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत आणखी एक वादळी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी हार्दिकनं तुफानी फटकेबाजी करून टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. मंगळवारी हार्दिकनं CAG संघाविरुद्ध 37 चेंडूत शतक आणि पाच विकेट्स घेतल्या होत्या. रिलायन्स 1 संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हार्दिकनं शुक्रवारी बीपीसीएल संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली.
रिलायन्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हार्दिकनं CAG संघाविरुद्ध मंगळवारी 39 चेंडूंत 105 धावा कुटल्या. त्याने 8 चौकार व 10 षटकारांची आतषबाजी केली होती. त्यानंतर त्यानं 26 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या कंबरेच्या दुखापतीमुळे त्याच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रियाही झाली होती. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो मैदानावर परतला. न्यूझीलंड दौऱ्यातील ट्वेंटी-20 व वन डे मालिकेतून तो पुनरागमन करणार, अशी शक्यता होती. पण, तो स्वतःच्या तंदुरुस्तीवर समाधानी नव्हता आणि म्हणून त्यानं दौऱ्यातून माघार घेतली होती.
शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत हार्दिकची फटकेबाजी पाहायला मिळाली. त्यानं 21 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना बीपीसीएलच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. त्यानं अनुकूल रॉयसह पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. हार्दिकने 52 चेंडूंत 150 धावा केल्या. अखेरच्या षटकापर्यंत त्याची फटकेबाजी कायम राहिली. त्यानं 55 चेंडूंत 20 षटकार आणि 6 चौकारांची आतषबाजी करताना नाबाद 158 धावा केल्या. सौरभ तिवारीने 41 धावा केल्या. रिलायन्स संघानं 20 षटकांत 4 बाद 238 धावा केल्या.
प्रत्युत्तरात बीपीसीएल संघ 134 धावांत तंबूत परतला. रिलायन्स 1 संघानं हा सामना 104 धावांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. बीपीसीएलकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. रिलायन्ससाठी राहुल चरहने 21 धावांत 3 विकेट्स घेतल्या, तर अनुकूल रॉयने 26 धावांत दोन बळी टिपले. हार्दिकने 6 धावांत एक विकेट घेतली.
पाहा व्हिडीओ...