अहमदाबाद : अगदी भारत-इंग्लंड दरम्यानच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईपर्यंत जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपास आलेल्या स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने ओळखले जात होते. मात्र बुधवारी सामन्याच्याआधी झालेल्या उद्घाटन समारंभात या स्टेडियमला भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावे देण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी जगातील या सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन केले. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी या स्टेडियमचे स्वप्न पाहिले होते.
तब्बल एक लाख ३२ हजार आसनक्षमता असलेल्या या भल्यामोठ्या स्टेडियमवर भारत व इंग्लंड यांच्यातील तिसरा व चौथा कसोटी सामना खेळविण्यात येईल. दखल घेण्याची बाब म्हणजे या स्टेडियमचा उद्घाटन समारंभ होण्यापर्यंत स्टेडियमच्या नव्या नावाबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.
राष्ट्रपती कोविंद यांनी गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या स्टेडियमचे उद्घाटन केले. या स्टेडियमच्या परिसरात क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून, या संकुलाला सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल म्हणून ओळखले जाईल. या संकुलात फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी आणि बॉक्सिंग अशा खेळांच्या सुविधा असतील, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. सुमारे २१५ एकर जागेत उभे राहणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत सुमारे २० स्टेडियम्स निर्माण होतील आणि यामध्ये खेळाडू व प्रशिक्षकांना अत्याधुनिक सोयीसुविधा मिळतील.
हे शक्ती, आकांक्षेचे प्रतिनिधित्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना या स्टेडियमची संकल्पना राबविली होती. त्यावेळी ते गुजरात क्रिकेट संघटनेचे अध्यक्षही होते. पर्यावरणाचा विकास म्हणून हे स्टेडियम योग्य उदाहरण आहे. हे स्टेडियम भारताच्या शक्ती आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतिनिधित्व करते.
भारताला क्रिकेटचा गड म्हणून ओळखले जाते आणि त्यासाठी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम भारतातच असायला हवे. या स्टेडियमच्या निमित्ताने भक्कम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करीत अहमदाबादची जगामध्ये वेगळी ओळख निर्माण होईल, असा विश्वास आहे. - रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
‘...म्हणून स्टेडियमला मोदींचे नाव’
हे स्टेडियम मोदी यांचे स्वप्न होते. आम्ही या स्टेडियमला पंतप्रधानांचे नाव देण्याचे निश्चित केले. या भव्य परिसरात भविष्यात राष्ट्रकुल क्रीडा, आशियाई क्रीडा आणि ऑलिम्पिक स्पर्धांचेही आयोजन करता येऊ शकेल. हे संपूर्ण क्रीडा संकुल पुढील सहा महिन्यामध्ये तयार होईल. यामुळे खेळाडूंना मोठी मदत मिळेल, याचा विश्वास आहे. आमचे अनेक खेळाडू मोठा संघर्ष करीत छोट्या शहरामधून येतात. त्यांना जीसीएने प्रोत्साहन दिले आहे.’ - अमित शाह, गृहमंत्री