Punjab Kings captain, IPL 2022 : लोकेश राहुलने ( KL Rahul) संघात कायम राहण्यास नकार दिल्यानंतर पंजाब किंग्सने त्याला रिलीज केले. IPL 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी पंजाब किंग्सनेमयांक अग्रवाल व अर्षदीप सिंग यांना संघात कायम राखले आणि ऑक्शनमध्ये शिखर धवन याला ताफ्यात घेतले. त्यामुळे आयपीएल २०२२मध्ये पंजाब किंग्सच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत मयांक व शिखर हे दोन स्पर्धक होते. त्यात शिखर धवनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव व कामगिरी लक्षात घेता त्याच्याकडेच ही जबाबदारी सोपवली जाईल असे वाटत होते. पण, पंजाब किंग्सने 'गब्बर' ला ठेंगा दाखवला आणि मयांकची कर्णधार म्हणून नियुक्ती केली.
मयांकने आयपीएलमध्ये १०० सामन्यांत २३.४२च्या सरासरीने २१३१ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. मागील दोन पर्वात त्याने ११ सामन्यांत ४२४ ( IPL 2020) आणि १२ सामन्यांत ४४१ ( IPL 2021) अशी कामगिरी केली आहे. शिखरच्या नावावर आयपीएलमध्ये १९२ सामन्यांत ३४.८४च्या सरासरीने ५७८४ धावा आहेत आणि त्यात २ शतकं व ४४ अर्धशतकं आहेत.
आयपीएल २०२२मध्ये मयांक पंजाब किंग्सचा कर्णधार असणार आहे. फ्रँचायझीने सोमवारी ही घोषणा केली. पंजाब किंग्सने १४ कोटींत मयांकला संघात कायम राखले होते. २०१८च्या लिलावात १ कोटींत पंजाब किंग्सने मयांकला आपल्या ताफ्यात घेतले होते. मयांक म्हणाला,'' पंजाब किंग्सचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळाली, याचे आनंद आहे आणि हे मी माझे भाग्य समजतो. चला यावेळी जिंकून दाखवूया..''
पंजाब किंग्ज : मयांक अग्रवाल ( १४ कोटी), अर्षदीप सिंग (४ कोटी), शिखर धवन ( ८.२५ कोटी), कगीसो रबाडा ( ९.२५ कोटी), जॉनी बेअरस्टो ( ६.७५ कोटी), राहुल चहर ( ५.२५ कोटी), शाहरुख खान ( ९ कोटी), हरप्रित ब्रार ( ३.८० कोटी), प्रभसिमरन सिंग ( ६० लाख), जीतेश शर्मा ( २० लाख), इशान पोरेल ( २५ लाख), लाएल लिव्हिंगस्टोन ( ११.५० कोटी), ओडीन स्मिथ ( ६ कोटी), संदीप शर्मा ( ५० लाख), राज अंगद बावा ( २ कोटी), रिषी धवन ( ५५ लाख), प्रेरक मंकड ( २० लाख) , वैभव अरोरा ( २ कोटी), भानुका राजपक्ष ( ५० लाख), बेन्नी हॉवेल ( ४० लाख), वृतिक चॅटर्जी ( २० लाख), बल्तेज धांडा ( २० लाख), अंश पटेल ( २० लाख), नॅथन एलिस ( ७५ लाख), अथर्व तायडे ( २० लाख).
आयपीएल २०२२ मधील कर्णधार ( Captains in IPL 2022)
- चेन्नई सुपर किंग्स - महेंद्रसिंग धोनी
- मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा
- दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत
- कोलकाता नाईट रायडर्स - श्रेयस अय्यर
- राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन
- सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन
- लखनौ सुपर जायंट्स - लोकेश राहुल
- गुजरात टायटन्स - हार्दिक पांड्या
- पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ??