नवी दिल्ली : भारतीय संघाला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडकडून झालेल्या दारूण पराभवामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. 4 साखळी सामने जिंकून भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र उपांत्य फेरीत आज इंग्लिश संघाने भारताचा 10 गडी राखून मोठा पराभव केला. भारताने दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लिश संघाने केवळ 16 षटकांत पूर्ण केला. या विजयासह इंग्लिश संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. फायनलचा सामना 13 तारखेला पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. भारताचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर भारतीय खेळाडू भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने एक भावनिक पोस्ट करून चाहत्यांना भावनिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. "आमच्या देशासाठी खेळ जिंकण्यासाठी आमचे सर्वोत्तम देण्याचा अभिमान आम्हाला नेहमीच आहे. यापुढे देखील आम्ही हे करत राहू. आम्हाला हवा होता तो निकाल मिळाला नाही पण आम्ही यापुढे एकत्रितपणे कूच करू", अशी भावनिक पोस्ट करून चहलने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. खरं तर चालू विश्वचषकात युजवेंद्र चहल भारतीय संघाचा हिस्सा होता. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यावरून देखील चाहते बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
हेल्स-बटलरसमोर भारतीय गोलंदाज गारद
2022च्या टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने 10 गडी राखून सहज विजय मिळवला. भारताकडून विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांना एकही बळी पटकावता आला नाही. अखेर इंग्लिश संघाने 16 षटकांतच 169 धावा करून फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडकडून सलामीवीर कर्णधार जोस बटलर आणि 80 तर ॲलेक्स हेल्स यांनी अनुक्रनमे 80 आणि 89 धावांची नाबाद खेळी केली.
धोनी सर्वात यशस्वी कर्णधार
भारताचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांना महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीची आठवण झाली. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याच्या नेतृत्वात भारताने टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. कर्णधार म्हणून तीनही ICC ट्रॉफी जिंकणारा क्रिकेट इतिहासातील एकमेव कर्णधार म्हणून धोनीची ओळख आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सत्रात पाकिस्तानचा 5 धावांनी तर 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला होता. याशिवाय 2013च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये भारताने इंग्लंडचा पाच धावांनी पराभव करून किताब पटकावला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Not the result we wanted but we march on together Yuzvendra Chahal has made an emotional post after India lost to England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.