Team India Fast bowling All Rounder, Sunil Gavaskar: भारतीय संघ आगामी टी२० आणि वन डे विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने संघबांधणी करत आहे. हार्दिक पांड्याच्या दुखापती आणि कामगिरीतील सातत्याचा अभाव यामुळे भारताला लवकरच वेगवान गोलंदाजी करणारा ऑलराऊंडर खेळाडू शोधावा लागणार आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये व्यंकटेश अय्यर हा एक पर्याय म्हणून उदयास आला आहे, पण त्याला हार्दिक पांड्यासारखा विश्वासार्ह फिनिशर होण्यास अद्याप खूप कालावधी लागू शकतो. दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांनीही आपल्यात वेगवान गोलंदाजी करणारा ऑलराऊंडर बनण्याची क्षमता असल्याचं वेळोवेळी दाखवून दिलं आहे. परंतु लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी सध्या या भूमिकेसाठी एका वेगळ्याच खेळाडूचं नाव सुचवलं आहे.
एका मुलाखतीत बोलताना सुनील गावस्कर यांनी या भूमिकेसाठी ऋषी धवनच्या (Rishi Dhawan) नावाचा उल्लेख केला. हिमाचल प्रदेशला विजय हजारे ट्रॉफी जिंकवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. ऋषी धवन गेल्या एक वर्षापासून दमदार फॉर्ममध्ये आहे. ऋतुराज गायकवाड नंतर धवन हा स्पर्धेत दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने ७६ च्या सरासरीने ४५८ धावा केल्या होत्या. स्पर्धेत त्याने ५ अर्धशतकेही झळकावली. तसेच ऋषी धवनने या स्पर्धेत १७ बळी टिपले.
“ऋषी धवन यापूर्वी भारताकडून ५-६ वर्षांपूर्वी खेळला आहे. पण सध्या तो ज्याप्रकारची कामगिरी करताना दिसतोय ते पाहून मला असं वाटतं की त्याला संघात स्थान मिळणं गरजेचं आहे. भारतीय संघाला वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू हवा आहे. जेव्हा संघात अष्टपैलू खेळाडू असतो तेव्हा कर्णधार आणि निवड समितीकडे अधिक पर्याय असतात. सध्याचा ऋषी धवनचा फॉर्म पाहता त्याला नक्कीच संधी मिळायला हवी. सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा आणि चांगली गोलंदाजी करू शकणारा असा एक खेळाडू संघात असायलाच हवा", असं गावसकर म्हणाले.