T20 World Cup स्पर्धेसाठी भारतीय संघ कसा असावा, याबाबत सारे माजी खेळाडू आपापली मत मांडत आहेत. अनेकांनी त्यांचे संभाव्या १५ खेळाडूही जाहीर केले आणि यापैकी अनेकांच्या संघांत रोहित शर्मा व विराट कोहली हे नाव कॉमन दिसले. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) यानेही आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाबाबत त्याचं मत व्यक्त केले. युवराजने २००७च्या वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर ८ च्या सामन्यात एका षटकात सलग सहा षटकार मारून इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला रडकुंडीला आणले होते. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच षटकात सहा षटकार मारणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.
भारताला तो वर्ल्ड कप जिंकून देण्यात युवीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. युवराज पुन्हा एकदा अमेरिका व कॅरिबियन येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार आहे. २०२४ च्या स्पर्धेसाठी युवीची ब्रँड अँम्बेसेडर म्हणून आयसीसीने निवड केली. भारताला दुसऱ्यांदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर दोन खेळाडूंनी चमकणे गरजेचे असल्याचे मत युवीने यावेळी व्यक्त केले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन खेळाडूंमध्ये ना विराट कोहली आहे ना रोहित शर्मा...
भारताला विजेतेपद मिळवायचे असेल जागतिक ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमार यादव याने अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे असल्याचे मत युवीने व्यक्त केले. त्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सर्वोत्तम कामगिरी करण्याची आवश्यकता असल्याचे देखील सुचवले.
तो म्हणाला, "सूर्यकुमार यादव भारताचा प्रमुख खेळाडू आहे. कारण तो ज्या पद्धतीने खेळतो, त्यामुळे तो १५ चेंडूंमध्ये सामना बदलू शकतो आणि तो निश्चितच खात्रीलायक आहे. भारतासाठी हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सूर्या महत्त्वाचा ठरणार आहे. मला वाटते की गोलंदाजीत जसप्रीत बुमराह देखील महत्त्वाचा आहे. मला संघात युझवेंद्र चहलसारखा लेग-स्पिनर पाहायला आवडेल कारण तो खरोखर चांगली गोलंदाजी करत आहे. पण एक फलंदाज असल्याने मी म्हणेन की सूर्यकुमार हा मुख्य खेळाडू आहे."
इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या दिनेश कार्तिकची फटकेबाजी पाहून युवराज प्रभावित झाला आहे. पण, अनुभवी यष्टिरक्षकाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची हमी मिळत असेल, तरच त्याच निवड झाली पाहिजे असे युवीचे मत आहे. "डीके चांगली फलंदाजी करत आहे. पण, त्याला २०२२च्या वर्ल्ड कपसाठी निवडले होते, परंतु तो चांगली कामगिरी करू शकला नव्हता. जर डीके तुमच्या इलेव्हनमध्ये नसेल तर त्याला निवडण्यात काही अर्थ नाही. रिषभ पंत व संजू सॅमसन दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत," असे युवी म्हणाला.