Join us

विराट कोहली कर्णधार अन् तू पुन्हा उपकर्णधार!; पत्रकारांच्या प्रश्नावर अजिंक्य रहाणेचं मन जिंकणारं उत्तर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली.

By स्वदेश घाणेकर | Updated: January 27, 2021 09:36 IST

Open in App
ठळक मुद्देअजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील पाच कसोटींमध्ये टीम इंडिया अपराजित राहिली आहेऑस्ट्रेलिया दौऱ्यातही ०-१अशा पिछाडीवरून टीम इंडियानं २-१असा ऐतिहासिक विजय मिळवला

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर  ०-१ अशा पिछाडीवरून टीम इंडियानं चार सामन्यांची मालिका २-१नं जिंकली. अजिंक्यच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटी सामन्यांत अपराजित राहिली. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली पाचपैकी चार सामने टीम इंडियानं जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियात अजिंक्यनं दाखवलेल्या नेतृत्वकौशल्यामुळे कर्णधारपद त्याच्याकडेच कायम रहावे, अशी मागणी होत आहे. पण, ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीच ( Virat Kohli) टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेसाठी अजिंक्य मंगळवारी रोहित शर्मा व शार्दूल ठाकूर यांच्यासह चेन्नईत दाखल झाला. त्यावेळी त्याला पत्रकारांनी तू पुन्हा उपकर्णधाराच्या भूमिकेत आलास, असा प्रश्न विचारला, त्यावर अजिंक्यनं त्याची भूमिका स्पष्ट केली.

''काहीच बदललेलं नाही. विराट हा टीम इंडियाचा कर्णधार होता आणि तोच राहणार. मी उपकर्णधार असेन. जेव्हा तो अनुपस्थित असेल तेव्हा मी संघाचे नेतृत्व करेन आणि टीम इंडियाच्या यशासाठी सर्वोत्तम योगदान देणे, ही माझी जबाबदारी आहे. कर्णधारपद मिळणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. कर्णधारपदाची जबाबदारी असताना तुम्ही कशी कामगिरी करता, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आतापर्यंत मी त्यात यशस्वी ठरलो आहे. भविष्यातही ठरेन, अशी आशा आहे. टीम इंडियाला असे विजय मिळवून देण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत राहिन,''असे अजिंक्य PTIशी बोलताना म्हणाला.

विराटसोबतच्या ताळमेळाबद्दल अजिंक्य म्हणाला,''विराट आणि मी आमच्यातील नाते घट्ट आहे. आम्ही दोघांनीही टीम इंडियासाठी देशात आणि परदेशात अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. विराट चौथ्या आणि मी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि त्यामुळे आम्ही अनेकदा चांगली भागीदारी केली आहे. आम्ही नेहमीच एकमेकांना पाठिंबा देतो.'' 

''विराट कोहली हा चतूर कर्णधार आहे. तो मैदानावर त्वरित चांगले निर्णय घेतो. जेव्हा फिरकीपटू गोलंदाजी करत असतात तेव्हा तो मला प्रोत्साहन देतो. कारण, अश्विन व जडेजा यांच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये झेल घेणे, किती अवघड असते, याची जाण त्यालाही आहे. विराटला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी त्यावर खरा उतरण्याचा नेहमी प्रयत्न करतो,''असे अजिंक्य म्हणाला.  

टॅग्स :अजिंक्य रहाणेविराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंड