सचिन कोरडे, गोवा : बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्यावर हितसंबंध जोपासल्याचा आरोप लावण्यात आला. या आरोपावर काही माजी क्रिकेटपटू संतापले. गौगुलीनेही प्रतिक्रिया दिली होती. आता भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी राहुलची बाजू उचलून धरली. त्यांनी द्रविडला दिलेली नोटीस म्हणजे क्रिकेटचे दुर्दैव अशी ‘जम्बो’ प्रतिक्रिया दिली.गोव्यात ‘डिजिटल डायबेट्स रजिस्ट्री’चे अनावरण करण्यात आले. या उद्घाटन समारंभानंतर काही पत्रकारांशी कुंबळे यांनी संवाद साधला. क्रिकेटवर बोलणे टाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, एका प्रश्नावर ते उत्तरले. ते म्हणाले, की हितसंबंध प्रत्येक क्षेत्रात जोपासले जातात. काही वेळा ते बाहेर येतात तर काही वेळा ते दिसत नाहीत. क्रिकेटमध्येच असे घडते असे नाही. तसे झाल्यास इतर क्षेत्रातही कारवाई व्हायला हवी. ज्या खेळाडूंनी देशासाठी ३०० हून अधिक सामने खेळले आहेत, असे क्रिकेटसाठी पुन्हा योगदान देणारे खेळाडू कमी आहेत. एवढे मोठे योगदान देणाºया खेळाडूंवर असा आरोप करणे चुकीचे आहे. माझ्या मते, जर तुम्हाला अशा खेळाडूंकडून योगदानाची अपेक्षा नसेल तर तुम्ही दुसºयाचा शोध घेऊ शकता. निश्चितपणे, हे क्रिकेटचे दुर्दैव आहे. दरम्यान, संजय गुप्ता यांनी भारताच्या माजी खेळाडूंवर हितसंबंध जोपासल्याचा आरोप केला होता. त्यात सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांचा समावेश आहे.
गोव्याच्या आठवणींत कुंबळे...ज्युनियर खेळाडू असताना गोव्यात पहिल्यांदा खेळायला आलो होतो. कर्नाटक राज्याकडून रणजी स्पर्धेतही गोव्यात खेळलो. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आठवणी चांगल्या आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आठवणी चांगल्या नाहीत. मडगाव येथील फातोर्डा स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध आम्ही सामना गमावला होता. त्या सामन्यात माझे प्रदर्शनही चांगले झाले नव्हते. त्यानंतर थोडी टीकासुद्धा झाली होती, असे कुंबळे यांनी गोव्याच्या आठवणींबद्दल सांगितले