नवी दिल्ली - नवी दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघातील दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देणार आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील टी-20 मालिकेत 38 वर्षीय आशिष नेहराला संघी देण्यात आली होती. नेहारानं 1 तारखेला न्यूझीलंड विरोधात होणाऱ्या सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नंतर तो केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरणार आहे जो आपल्या होम ग्राउंडवर भारतात दिमाखात निवृत्ती घेणार आहे. सचिनला शेवटचा सामना मुंबईच्या त्याच्या होम ग्राउंडवर खेळायला मिळाला होता.
सचिन आणि नेहराचे एकवेळचे संघसहकारी असणाऱ्या कुंबळे, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग, झहीर आणि सेहवाग यांनाही हे भाग्य लाभले नाही. तर युवराज आणि भज्जी यांना तर भारतीय संघाची दारे आता बंद झाल्यात जमा आहेत. नेहराचा अंतिम सामना दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर होणार असल्यामुळे तो सर्वात सुदैवी खेळाडू ठरणार आहे.
सध्या भारतीय संघात खेळत असलेला नेहरा हा एक अनुभवी आणि जेष्ठ खेळाडू आहे. तो मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी, गौतम गंभीर आणि आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. विराट कोहली हा नेहराचा शेवटचा भारतीय कर्णधार असेल ज्याच्या नेतृत्वाखाली तो शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळेल.
नेहराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द -1999 मध्ये नेहराची आंतराष्ट्रीय कारकीर्द अजहरुद्दीनच्या कर्णधारपदाखाली सुरुवात झाली. 38 वर्षीय नेहरा भारताकडून 120 वन-डे सामने खेळला असून, यात त्याने 157 विकेट घेतल्या आहेत. पण त्याने शेवटचा वन-डे सामना 2011 मध्ये खेळला आहे. मात्र, टी-20 साठी तो पूर्णपणे फिट आहे. त्यामुळे या वर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-20त त्याला संधी मिळाली होती. त्याने 26 टी-२० सामन्यांत 34 बळी मिळवले आहेत.
19 वर्षात झाल्या 12 शस्त्रक्रिया- एक वेगवान गोलंदाज म्हणून एकोणीस वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहणं हे खरोखरच सोपं नाही. या एकोणीस वर्षांत नेहराला तब्बल बारा शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळेच त्याच्या पुनरागमनाचा सिलसिला कौतुकास्पद ठरतो.
15व्या वर्षी विराटनं घेतला होता नेहराच्या हातून पुरस्कार - विराट कोहली जेव्हा 15 वर्षाचा होता त्यावेळी त्याची सर्वात प्रथम नेहराची भेट झाली होती. त्यावेळी नेहराचं वय होत 24 वर्ष. 2002-03 मध्ये झालेला दक्षिण आफ्रिकेतला विश्वचषक नेहराने चांगलाच गाजवला होता. त्यामुळे दिल्लीतल्या एका स्थानिक स्पर्धेचं पारितोषिक वितरण त्याच्या हस्ते झालं होतं.