मुंबई : भारतामध्ये होणाऱ्या आगामी वनडे आणि ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यांमध्ये महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. यापुढे भारतात होणाऱ्या वनडे आणि ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यांमध्ये ' एसजी 'चा पांढऱ्या रंगाचा चेंडू वापरण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतात कसोटी आणि प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ' एसजी 'चा चेंडू वापरला जातो. पण वनडे आणि ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये ' कुकाबुरा ' हा चेंडू वापरला जात होता. पण यापुढे ' एसजी 'चा चेंडू वापरला जाणार आहे.
बीसीसीआयने सय्यक मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धेत प्रायोगिक तत्वावर ' एसजी 'चा पांढरा चेंडू वापरला होता. त्यानंतर भारतातील प्रत्येक राज्यांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांचा बैठकीचे आजोयन बीसीसीआयने केले होते. या बैठकीमध्ये प्रशिक्षक आणि कर्णधारांनी बीसीसीआयच्या क्रिकेट ऑपरेशनचे महाव्यवस्थापक साबा करीम यांच्याशी चेंडूबाबत चर्चा केली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार आता यापुढे भारतातील वनडे आणि ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यांमध्ये ' एसजी 'चा चेंडू वापरण्यात येणार आहे.
काही दिवसांमध्ये बीसीसीआयची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये साबा करीम हे प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्या सुचना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांपुढे ठेवणार आहेत. त्यानंतर बीसीसीआयच्या बैठकीमध्ये या सुचनेवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.