सिडनी : भारताचा संघ सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या सामन्यात 31 धावांनी विजय मिळवला. पण आता ऑस्ट्रेलियामध्ये टॉस म्हणून नाणे उडवले जाणार नाही, असे म्हटले जात आहे.
आतापर्यंत क्रिकेटमध्ये टॉस करताना नाणे उडवले जाण्याची प्रथा होती. पण ही प्रथा आता ऑस्ट्रेलियाने मोडीत काढायचे ठरवले आहे. पण जर टॉसच्या वेळी नाणे भिरकावणार नाही तर नेमका निर्णय कसा घेणार याबाबत मात्र उत्सुकता आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग खेळवण्यात येते. 19 डिसेंबरला या लीगचे सामने खेळायला सुरुवात होणार आहे. या सामन्यापासून जुनी नाणेफेकीची प्रथा बंद करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. या सामन्याचा टॉस करताना आता बॅट हवेत उडवली जाणार आहे. त्यामुळे आता टॉसला मराठीमध्ये नाणेफेक म्हणता येणार नाही.