रोहित नाईक, वरिष्ठ उपसंपादक, मुंबई
टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर झालेला आनंद अभूतपूर्व होता. २९ जूनची ती रात्र प्रत्येक भारतीय कधीच विसरु शकणार नाही. मात्र, या विजयाला एक भावनिक किनारही लाभली ती 'रो-को' अर्थात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीमुळे. हे दोन्ही दिग्गज आता भारतीय टी-२० संघाचा भाग नसणार ही गोष्ट मोठ्या कष्टाने स्वीकारावी लागणार आहे. त्यामुळेच, आता भारतीय संघाचे कसं होणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला.
रोहित-कोहली यांच्याविना भारतीय संघाची कल्पनाच करु शकत नाही, अशी प्रत्येक क्रिकेटचाहत्याची प्रतिक्रिया होती. सचिन तेंडुलकरविना भारतीय संघाचा विचारच होऊ शकत नाही, असेही पूर्वी म्हटले जायचे. परंतु, २०१३ पासून हे सत्य प्रत्येक क्रिकेटप्रेमींनी पचवले आणि तेच सत्य आता रोहित-कोहलीविना आंतराष्ट्रीय टी-२० क्रिकेट पाहताना पचवावे लागणार आहे.
बदलासाठी तयार हाेताेय नवा संघ
रोहित म्हणजे गोलंदाजांची धुलाई, षटकारांचा पाऊस, धावगतीला कमालीचा वेग.
दुसरीकडे, कोहली म्हणजे खंबीर फलंदाजी, नजाकतदार फटकेबाजी, परिस्थितीनुसार संघाला सावरणारी खेळी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक क्षणाला कुटून भरलेला जोश.
बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि हा नियम प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक क्षेत्रात दिसून येतो. याच बदलासाठी आता भारताचा टी-२० संघ तयार होत आहे.
देणगी आयपीएलची
आयपीएल स्पर्धा ही आर्थिकदृष्ट्या बीसीसीआयसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली. मात्र, या स्पर्धेचा फायदा भारतीय क्रिकेटमधील नवीन गुणवत्ता शोधण्यासाठीही अधिक झाला आहे.
हीच गुणवत्ता आता रोहित-कोहलीनंतरच्या पर्वामध्ये दिसून येणार आहे. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, हर्षीत राणा, अर्शदीप सिंग असे अनेक गुणवान खेळाडू भारतीय क्रिकेटला आयपीएलद्वारे लाभले आहे.
दुसरा शर्मा सज्ज आहे
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० निवृत्ती घेतल्यानंतर काही दिवसांनी सुरु झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून अभिषेकच्या रुपाने भारतीयांना आणखी एक धडाकेबाज शर्मा लाभला. खरं म्हणजे, यंदाच्या आयपीएलमध्येच हैदराबाद संघाकडून अभिषेक शर्माने सर्वांचे लक्ष वेधले होते.
रोहितप्रमाणेच स्फोटक फलंदाजी करत त्याने झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० शतकही ठोकले. त्यामुळेच एक शर्मा गेला आणि दुसरा शर्मा आला, असे भारतीय क्रिकेटप्रेमी म्हणू लागले.