Join us  

आता नुसती खेळपट्टीची चर्चा नको, क्रिकेटवर बोलूया! गिल आणि ग्रीन भविष्यातील सुपरस्टार

बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी सर्वांच्या नजरा या खेळपट्टीवर होत्या; कारण आधीच्या तीनही कसोटी अवघ्या तीन दिवसांमध्ये संपल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 8:48 AM

Open in App

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर

बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी सर्वांच्या नजरा या खेळपट्टीवर होत्या; कारण आधीच्या तीनही कसोटी अवघ्या तीन दिवसांमध्ये संपल्या. नागपूर, दिल्ली आणि त्यानंतर इंदूर या तीनही ठिकाणच्या खेळपट्ट्या फिरकीला खूप जास्त अनुकूल होत्या. त्यामुळे चौथ्या कसोटीत हाच प्रकार पाहायला मिळेल का, हा यक्षप्रश्न क्रिकेट चाहत्यांना सतावत होता. साधारणपणे पाहुणा संघ हा नेहमीच भारतीय खेळपट्ट्यांवर अडखळताना दिसलेला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा संघही त्याला अपवाद ठरला नाही. मात्र इंदूरमध्ये पुन्हा फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनविणे भारतीय संघाच्या अंगलट आले. महत्त्वाचे म्हणजे भारतीय फलंदाजांची हाराकिरी या दारुण पराभवाला कारणीभूत ठरली.

ऑस्ट्रेलियाचे फिरकी त्रिकूट प्रभावी ठरले

ऑस्ट्रेलियाचे फिरकी त्रिकूट लायन, मर्फी आणि कुहेनमन यांनी भारताच्या अश्विन, जडेजा आणि अक्षर यांच्या पावलावर पाऊल टाकत टिच्चून गोलंदाजी केली. त्यामुळे चौथ्या कसोटीत फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवायची का, याचा विचार भारतीय संघ व्यवस्थापनाला करावा लागला.अहमदाबादच्या खेळपट्टीने पहिल्याच दिवशी सर्वांनाच आश्चर्यचकित केले; कारण ही खेळपट्टी काही प्रमाणात पाटा होती. त्यामुळे या कसोटीत तीन दिवसांचा खेळ संपल्यानंतरही खेळपट्टी अजूनही शांतच दिसते आहे. जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी डोळ्यांसमोर ठेवून पीच क्युरेटरला चौथ्या कसोटीची खेळपट्टी पाटा ठेवण्यास सांगितले गेले का, हासुद्धा एक प्रश्नच आहे; कारण लायन आणि कंपनीसमोर पुन्हा भारतीय फलंदाजांची लाज जायला नको म्हणून ही खबरदारी घेतली गेली असावी.

खेळपट्टीचे महत्त्व अनन्यसाधारण

मला तरी हे शक्य वाटत नाही; कारण खेळपट्टी फिरकीला अनुकूल बनविणे ही एकदाची रणनीती असू शकते. मात्र चार ते पाच दिवसांमध्ये पाटा खेळपट्टी तयार करणे मला तरी शक्य वाटत नाही; कारण तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत एवढ्याच दिवसांचा कालावधी होता. त्यामुळे एकाएकी खेळपट्टीचा नूर पीच क्युरेटर बदलवू शकत नाही. दुसरीकडे, खेळपट्टी ही क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्त्व ठेवून असते. कधी कधी तिच्याकडे अतिलक्ष दिले जाते. त्यामुळे होते काय की, आपल्या स्किल्स आणि टेम्परामेंट या दोन गोष्टींच्या आधारे क्रिकेट खेळायचे सोडून खेळाडू खेळपट्टीचा जास्त बाऊ करतात.

अहमदाबादेत कसोटी रंगतदार होईल

पहिले तीन कसोटी सामने एकतर्फी झाले असले तरी अहमदाबाद कसोटी याला अपवाद ठरू शकते; कारण खेळपट्टी फलंदाजीला अनुुकूल असली तरी गोलंदाज प्रभावी ठरू शकतात, हे लायन आणि अश्विनने दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे या दोघांनी आपला दर्जा सिद्ध केला आहे. तीन दिवसांमध्ये जरी मोठ्या प्रमाणात बळी गेले नसले तरी रविवारी चौथ्या दिवशी रोमांचक क्रिकेट अनुभवायला मिळू शकते. जर भारतीय फलंदाजी चौथ्या दिवशी कोसळली आणि त्यानंतर कांगारूंनी झटपट धावा केल्या तर या कसोटीत काहीही होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भारतीय संघ ५० ते ६० धावांची आघाडी घेण्यात यशस्वी ठरलाच तर मात्र पाहुणे दबावाखाली येऊ शकतात.

आगामी काळ गिल आणि ग्रीनचा 

चौथ्या कसोटी सामन्यात दोन खेळ्यांनी क्रिकेटचाहत्यांचे मन मोहून गेले. पहिली म्हणजे कॅमेरून ग्रीनची शतकी खेळी आणि त्यानंतर शुभमनने दिलेला १२८ धावांचा नजराणा. हे दोघेही जवळपास २४ वर्षांचे युवा. विशेष म्हणजे ग्रीन दुखापतीमुळे, तर गिल संघातील तीव्र स्पर्धेमुळे पहिल्या दोन कसोटी खेळू शकला नव्हता. मात्र या दोघांची अनुपस्थिती भारत आणि ऑस्ट्रेलियाला प्रकर्षाने जाणवू शकते, हे त्यांनी या कसोटीतील खेळीतून सिद्ध केले आहे. प्रत्येक दशक काही मोठे खेळाडू घडवत असते. ७० च्या दशकात सुनील गावसकर, व्हीव रिचर्डस, ग्रेग चॅपेल उदयास आले. त्यानंतरचा काळ सचिन, लारा, पॉंटिंगने गाजवला. २१व्या शतकात विराट, स्मिथ, रुट आणि विल्यम्सन हे फॅब फोर आले. तर सध्या सुरू असलेेले दशक हे गिल, बाबर, लाबूशेन, ग्रीन आणि इंग्लंडच्या हॅरी ब्रुकचे असणार आहे.

ख्वाजा सर्वोत्कृष्ट ऑस्ट्रेलियन फलंदाज

आतापर्यंत या कसोटी सामन्यात उस्मान ख्वाजाने सर्वांनाच प्रभावित केले. भारतीय खेळपट्टांवर १८० धावांची खेळी करणे काही सोपे काम नव्हते. ऑस्ट्रेलिया संघात जवळपास अडीच वर्षांनी पुनरागमन केल्यानंतर ख्वाजाचे हे सहावे शतक होते. इतर कुठल्याही फलंदाजांपेक्षा गेल्या एका वर्षात ख्वाजाने केलेली कामगिरी उजवी ठरली आहे. सध्याच्या घडीला तो ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्कृष्ट कसोटी फलंदाज आहे.

‘विराट’ खेळींची ही नांदी

विराटची ५९ धावांची खेळी सुखावणारी होती. कसोटी क्रिकेटमधल्या त्याच्या शेवटच्या शतकी खेळीला आता जवळपास चार वर्षे व्हायला आली आहेत. जर तो रविवारी कसोटी शतकांचा दुष्काळ संपविण्यात यशस्वी ठरला तर आगामी काळातील मोठ्या खेळीची ती नांदीच ठरेल. डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत जर पोहचलो तर विराट कोहलीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारतआॅस्ट्रेलिया
Open in App