- अयाझ मेमन
भारताने श्रीलंकेला मोठ्या फरकाने नमवून ३-० अशी मालिका जिंकली. या मालिकेत श्रीलंका संघ अत्यंत कमजोर दिसला. त्यांची कामगिरी खूप निराशाजनक झाली. पहिल्या सामन्यात त्यांचा खराब पराभव झाला. दुसºया सामन्यात आणखी खराब पराभव झाला, तर तिसºया सामन्यात हा संघच खराब वाटला. कारण त्यांची फलंदाजी, गोलंदाजी काहीच चालले नाही. खास करून फलंदाजांनी श्रीलंकन पाठीराख्यांना अत्यंत निराश केले. कारण, या खेळपट्टीमध्ये दोन वेळा सर्व बाद होण्यासारखे विशेष काहीच नव्हते. तसेच दोन्ही डावांमध्ये यजमान दोनशे धावाही करू शकले नाहीत. भारतीयांनी चांगली गोलंदाजी केली. पण एक मान्य करावे लागेल की, श्रीलंकन संघामध्ये पूर्वीसारखा जोश आणि लढवय्यापणा आता दिसला नाही. त्यामुळे आता त्यांना आपल्या संघाचा गांभीर्याने विचार करावा लागेल. काही दिग्गजांच्या निवृत्तीनंतर नेतृत्व बदलले आहे; मात्र तरीही त्यांच्याकडे गुणवत्ता नाही असे मुळीच नाही. पण, आज त्यांचे खेळाडू डोक्यातच पराभवाचा विचार करून मैदानात उतरतात आणि प्रत्यक्षात रिझल्टही तसाच येत आहे.
दुसरीकडे नक्कीच कौतुक करावे लागेल ते टीम इंडियाचे. त्यांनी नियोजनबद्ध खेळ करत मालिका ३-० अशी जिंकली. दोन सामने जिंकून मालिका विजय निश्चित केल्यानंतरही त्यांनी कोणतीही संधी दिली नाही. विशेष म्हणजे संपूर्ण संघावर नजर टाकल्यास प्रत्येक खेळाडूची गुणवत्ता दिसून येते. प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिले असून एकही खेळाडू अपयशी ठरला नाही हे सर्वांत विशेष. मुरली विजयच्या जागी आलेल्या शिखर धवनने दोन शतके झळकावली. हार्दिक पांड्याने तिसºया कसोटीत जबरदस्त शतक ठोकले. अष्टपैलू असलेल्या हार्दिकने निवडकर्त्यांसह प्रशिक्षकापुढेही संघनिवडीचा नवा प्रश्न उभा केला आहे. कुलदीप यादवने रवींद्र जडेजाची कमी भरताना ६ बळी घेतले. मोहम्मद शमीने सातत्याने बळी घेतले. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि स्वत: कर्णधार विराट कोहली सर्वांनीच आपली चमक दाखवली. यावरून दिसते की भारतीय संघात कोणीही अपयशी ठरला नाही. दखल घेण्याची बाब म्हणजे अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी सर्वच खेळाडूंची एकमेकांसह स्पर्धा लागली असून, ही भारतीय क्रिकेटसाठी खूप चांगली बाब आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी सर्वोत्तम खेळाडू निवडण्याचे नवे आव्हान कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यापुढे उभे असेल.
यादरम्यान आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली. यामध्ये काही आश्चर्यकारक गोष्टींनी लक्ष वेधले आहे. सर्वांत पहिले म्हणजे युवराजचा संघात समावेश नाही. सुरेश रैना, दिनेश कार्तिक व धक्कादायक म्हणजे रिषभ पंतही या संघात नाही. मला सर्वांत वाईट रिषभबाबत वाटते. कारण, हा युवा खेळाडू अत्यंत गुणवान आहे, त्याच्यापुढे मोठी कारकीर्द असून जेवढी त्याला संधी मिळेल तेवढा तो परिपक्व होईल. पण निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटले की, आगामी २०१९ विश्वचषक स्पर्धेसाठी २०-२२ खेळाडूंचा एक चमू तयार केला आहे. त्यात दर ४-५ महिन्यांत प्रत्येकाला संधी मिळेल. आश्विन-जडेजा या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. धोनी आणि इतर खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.
त्यामुळे एकप्रकारे ही रोटेशन पद्धत चांगली आहे. २०१९ साल येण्यास अजूनही २ वर्षे आहे आणि त्याकडे बघता प्रत्येक खेळाडूला संधी देणे आवश्यक आहे. त्यामुळे विश्वचषकापर्यंत कोणाचा फॉर्म कायम राहतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पण तरीही मला वाटते की रिषभसारख्या खेळाडूला संघात स्थान मिळणे आवश्यक होते. आता श्रीलंका मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा सामना कसा करेल याकडे लक्ष लागले आहे.
(संपादकीय सल्लागार)
Web Title: Now focus on a limited over series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.