वॉशिंग्टन : इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विश्वचषकात त्यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. संघाच्या या कामगिरीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी आता पाकिस्तानचा संघ घडवण्याचे मनावर घेतले आहे.
इम्रान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 1992 साली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर मात्र पाकिस्तानला एकदाही विश्वचषक जिंकला आलेला नाही. इम्रान हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील एका कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानच्या संघाविषयी आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर संघाची नव्याने बांधणी करणार असल्याचेही संकेत दिले आहेत.
इम्रान म्हणाले की, " पाकिस्तानच्या संघात बदल करण्याची गरज आहे. मी पूर्ण सिस्टीम बदलणार आहे. संघात काही नवीन चेहरेही पाहायला मिळतील. आगामी विश्वचषकात पाकिस्तानचा संघ प्रोफेशनल असेल."