दुबई - कोणत्याही गोष्टींमध्ये परिवर्तन होणं गरजेचं असतं असं म्हणलं जातं, मग क्रीडा आणि त्यातल्या त्यात क्रिकेट यात कसं बरं मागे राहुन चालेल?. आयसीसीच्या विशेष क्रिकेट समितीने सध्याच्या काही नियमांमध्ये सुधारणा करुन नवीन नियम लागू करण्याची शिफारस केली होती. या नवीन नियमांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) मंजुरी दिली आहे. नव्या नियमांत आचारसंहिता, डीआरएसचा उपयोग आणि बॅटचा आकार आदींचा समावेश आहे. हे नवे नियम 28 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या मालिकेसाठी लागू होणार आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचे दोन वन-डे आयसीसीच्या जुन्याच नियमानुसार खेळवले जातील असे आयसीसीनं स्पष्ट केलं आहे. तर तीन टी-20 सामने नवीन नियमानुसार खेळवले जातील. विशेष म्हणजे, कसोटी, वनडेप्रमाणे टी-20 तही डीआरएस पद्धत लागू होणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. कसोटीमध्ये प्रत्येक डावाच्या 80 षटकानंतर डीआरएस घेता येणार नाही. फुटबॅालच्या खेळात ज्याप्रमाणे अंपायर (पंच) एखाद्या खेळाडूला गंभीर गैरवर्तनाबद्दल मैदानातून बाहेर करू शकतो, तसा अधिकार आता क्रिकेटमध्येही पंचाना असणार आहे.
असे आहेत नवे नियम - - एखाद्या खेळाडूने पंचांकडे फलंदाज पायचीत ( LBW ) असल्याचं अपील केलं, आणि पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवल्यानंतर निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेताना जर, अंपायर्स कॉल असा निर्णय आला तरीही ‘तो’ संघ आपली ( DRS ) ची संधी गमावणार नाहीये. याआधीच्या नियमांप्रमाणे तिसऱ्या पंचांनी अंपायर्स कॉल असा निर्णय दिल्यावर संघाची ( DRS ) ची संधी संपून जायची.
- कसोटी सामन्यांत यापुढे एका डावात ८० षटकांनंतर DRS च्या दोन नवीन संधी मिळणार नाहीत. याआधी प्रत्येक संघाला ८० व्या षटकांनंतर दोन नवीन संधी मिळायच्या.