Join us  

आता आमच्यावरील जबाबदारी वाढली आहे - पूनम राऊत

‘विश्वचषक स्पर्धेनंतर खूप काही बदल झाले असून आमच्याकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील प्रत्येक सामना जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 6:07 PM

Open in App

- रोहित नाईकमुंबई : ‘विश्वचषक स्पर्धेनंतर खूप काही बदल झाले असून आमच्याकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील प्रत्येक सामना जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल. सध्या आमच्यावर अधिक जबाबदारी असून देशांतर्गत मोसम चांगला गेल्याने आत्मविश्वास वाढला आहे. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेनंतर पहिलीच स्पर्धा असल्याने आम्ही उत्साहित आहोत, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज पूनम राऊत हिने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.५ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी ‘बीसीसीआय’ने बुधवारी संघाची घोषणा केली. विश्वचषक स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतर महिला संघाकडून भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मालिकेच्या तयारीविषयी पूनम म्हणाली, ‘नुकतेच आम्ही एकदिवसीय, सुपरलीग आणि चॅलेंजर ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धांत खेळलो. आता आम्ही टी२० स्पर्धेत खेळणार आहोत. त्यामुळे संघातील सर्वच खेळाडूंना या स्पर्धांचा फायदा होईल.’

दक्षिण आफ्रिका दौ-याबाबत पूनम म्हणाली की, ‘विश्वचषक पात्रता फेरीत आम्ही दक्षिण आफ्रिकेला नमवले असले तरी तो संघ मजबूत आहे. विशेष म्हणजे पात्रता फेरीतील दोन्ही संघ विश्वचषक उपांत्य फेरीत पोहोचले होते. त्यामुळे आफ्रिकेला अजिबात गृहीत धरू शकत नाही. सर्वच सामने चांगले आणि अटीतटीचे होतील. याआधीचे आफ्रिकेविरुद्धचे सामनेही चुरशीचे झाले होते. दोन्ही संघांना एकमेकांची ताकद आणि कमजोरी माहीत असल्याने या वेळीही तीच चुरस दिसेल; शिवाय बºयाच खेळाडूंना आफ्रिकेत खेळण्याचा अनुभव असल्याचा फायदा होईल.’

एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ टी२० मालिका खेळेल. शिवाय यंदा महिलांची टी२० विश्वचषक स्पर्धाही रंगणार आहे. त्यावर पूनमने सांगितले की, ‘टी२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी हा दौरा महत्त्वाचा ठरेल; शिवाय देशांतर्गत टी२० स्पर्धेत अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. तरी, अंतिम संघात फार बदल होण्याची अपेक्षा नाही. आफ्रिका टी२०मध्ये मजबूत असून आम्ही अद्याप टी२०मध्ये स्वत:ला सिद्ध केलेले नाही. त्यामुळे भारतीय संघाकडे एक संधी आहे.’भारताचा पुरुष संघ दक्षिण आफ्रिका दौºयावर असून त्यांच्याशी भेटण्याचा सध्या तरी कार्यक्रम नसल्याचे सांगताना पूनम म्हणाली की, ‘अजून तरी पुरुष संघाची भेट घेण्याचे ठरलेले नाही. पण जर भेटता आले तर चांगलेच असेल. क्रिकेटच्या काही गोष्टी शेअर करता येतील.’मुंबईतील माझ्या अकादमीला मुलींचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येक दिवशी माहिती मिळत असते. काही मुलींची राज्यस्तरीय ज्युनिअर संघात निवडही झाली आहे. बरेच दिवस व्यस्त कार्यक्रमामुळे मला अकादमीमध्ये जाता आले नाही. पण एकूणच अकादमी आणि खेळाडूंमध्ये खूप सुधारणा होत आहेत.- पूनम राऊतजेमिमा जबरदस्त...युवा खेळाडू जेमिमा रॉड्रिग्सबद्दल पूनमने म्हटले की, ‘जेमिमाबद्दल आतापर्यंत ऐकले होते. चॅलेंजर ट्रॉफीमध्ये तिच्यासोबत खेळताना तिचा खेळ कळाला. ती खरंच जबरदस्त फलंदाज आहे. ती युवा असल्याचे कधीच भासले नाही. जेमिमा खूप परिपक्व असून इतक्या कमी वयामध्ये चांगल्या पद्धतीने खेळणे मोठी गोष्ट आहे. भविष्यात जेमिमाला खूप क्रिकेट खेळायचे आहे. तिने देशांतर्गत सामन्यांमध्ये स्वत:ला सिद्ध केलेच आहे; पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे वेगळे असून तिथे थोडा वेळ लागतो. भविष्यात ती नक्कीच एक चांगली खेळाडू होईल.’

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ