मुंबई : कसोटी सामना किती दिवसांचा असतो, असे विचारले तर तो पाच दिवसांचा असतो, असे कोणताही क्रिकेट चाहता सांगेल. पण आता यामध्ये मोठा बदल आयसीसी करणार आहे. कारण आता कसोटी सामना पाचऐवजी चार दिवसांचा खेळवण्यात येणार असल्याचे समजत आहे.
सध्याच्या घडीला क्रिकेटचा वेग वाढलेला आहे. बरेच सामने चार दिवसांमध्येच संपत असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पुढील काही वर्षांमध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेट वाढणार आहे. त्यामध्ये कसोटी क्रिकेट मरणासन्न होऊ नये, यासाठी आयसीसी चार दिवसांचा कसोटी सामने खेळवण्याचे ठरवत आहे.
सुरुवातीला कसोटी सामना हा सहा दिवसांचा होता. पूर्वी कसोटी सामन्यांमध्ये एक दिवस विश्रांतीसाठीही राखीव ठेवलेला असायचा. त्यानंतर कसोटी सामना ६ दिवसांऐवजी पाच दिवसांचा करण्यात आला. आता कसोटी सामना ५ दिवसांऐवजी चार दिवसांवर करण्याचा विचार आयसीसी करत आहे.
या निर्णयाबाबत आयसीसीने अजून अधिकृतपणे कोणतीही गोष्ट मांडलेली नाही. पण हा नवीन नियम २०२३ साली होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेपासून सुरु करण्याचा आयसीसीचा मानस आहे. त्यामुळे या गोष्टीवर सध्या विचारविनिमय सुरु असून काही तज्ञांकडून यावर मत मागितले जात आहे.