नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटला वयचोरीची किड लागली, असं काही दिवसांपर्यंत म्हटलं जायचं. पण या बाबतीत बीसीसीआयने कठोर निर्णय घेतला आहे. जर एखाद्या खेळाडूने वय लपवलं तर त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. या निर्णयाचे भारतीय क्रिकेट वर्तुळामध्ये स्वागत केले जात आहे.
बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची दिल्लीमध्ये गुरुवारी एक बैठक झाली. या बैठकीमध्ये खेळाडूंची वय चोरी, या विषयावर चर्चा करण्यात आली. जर एखाद्या खेळाडूने वय चोरी केली तर त्याच्यावर दोन वर्षांची बंदी आणि फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय बीसीसीआयने या बैठकीमध्ये घेतला आहे.
" जर एखाद्या खेळाडूने खोटा जन्माचा दाखला सादर केला किंवा जन्म दाखल्याबरोबर छेडछाड केली तर त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर दोषी आढळलेल्या खेळाडूवर दोन वर्षांनी बंदीही घालण्यात येईल," असे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने सांगितले आहे.