चेम्सफोर्ड : ‘इंग्लंडविरुद्धचा पराभव निराशाजनक आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाला निडर बनण्यासाठी आता विचारसरणी बदलण्याची गरज आहे,’ असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांनी व्यक्त केले. रतीय महिलांना इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत १-२ असा, तर एकदिवसीय मालिकेतही १-२ असा पराभव पत्करावा लागला. त्याआधी झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीयांनी झुंजार खेळ करताना सामना अनिर्णीत राखली होती. या पराभवानंतर प्रशिक्षक पवार यांनी संघाच्या मधल्या फळीत बदल करण्याची गरज असल्याचे संकेत दिले.
एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार मिताली राजचा अपवाद वगळता हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया आणि पूनम राऊत यांसारख्या प्रमुख फलंदाजांना झुंजावे लागले. मिताली धावा जरी काढल्या असल्या, तरी तिचा स्ट्राइक रेट फारसा चांगला नव्हता. पोवर यांनी सांगितले की, ‘मिताली चांगली फलंदाजी करत आहे, पण आम्हाला किमान आणखी एका चांगल्या फलंदाजाची गरज आहे. यामुळे पॉवर प्लेमध्ये प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणता येईल. आम्हाला निर्भिडपणे खेळावे लागेल. मी पहिल्याच मालिकेत त्यांना असे खेळण्यास बाध्य करणार नाही. सर्व खेळाडू एका विचारसरणीने खेळत आहेत. खेळाडूंच्या अनुकूल गोष्टींचे आम्हाला आकलन करावे लागेल.’
पोवार पुढे म्हणाले की, ‘मधल्या षटकांमध्ये संथ फलंदाजी होत आहे. या चक्रातून खेळाडूंना बाहेर काढावे लागेल आणि त्यासाठी आम्हाला त्यांना समजून घ्यावे लागेल. यासाठी अनेक चर्चा घडतील. आधुनिक क्रिकेट निडर होऊनच खेळले जाऊ शकेल.’ खेळाडूंमध्ये बदल करण्याचे आतापर्यंतचे प्रयत्न अपयशी ठरल्याचेही पोवार यांनी मान्य केले. ते म्हणाले, ‘आता दोनच पर्याय उपलब्ध आहेत. एक तर सध्याच्या खेळाडूंनी आपल्यापरीने बदल घडवले पाहिजेत किंवा मधल्या फळीत अन्य खेळाडूंना खेळविले पाहिजे. यावेळी आम्ही काही प्रयोगही केले, पण ते यशस्वी ठरले नाहीत. भविष्यात नवे प्रयोग होऊ शकतील आणि नव्या खेळाडूंना संधी मिळू शकेल. आगामी आयसीसी ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेच्यादृष्टीने संघात बदल करण्याच्या हेतून उपलब्ध सर्व पर्यायांचा वापर करण्यात येईल, असेही पोवार यांनी यावेळी सांगितले.