सचिन कोरडे : एक काळ असा होता की महिला क्रिकेट संघासाठी मर्यादित पर्याय उपलब्ध असायचे. संघ व्यवस्थापन चिंतेत असायाचा. प्रशिक्षकांपुढे मोठे प्रश्न असायचे. मात्र, महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने भरारी घेतली त्याचा सकारात्मक परिणाम आज दिसून येत आहे. टीम इंडियाच्या महिला संघांत स्थान मिळवण्याची आता मोठी चुरस पाहायला मिळत आहे. खेळाडूंमध्ये मोठी स्पर्धा वाढली आहे. याचाच परिणाम नुकताच दिसून आला. वेस्ट इंडिजमधील टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडकर्त्यांपुढे खेळाडूंचे मोठ पर्याय होते. त्याचाच फटका विश्वचषक संघाची माजी सदस्य तसेच अनुभवी खेळाडू शिखा पांडे हिला बसला. तिच्या जागी नवोदित पूजा वस्त्रकारने बाजी मारली. तिने शिखाची ‘विकेट’ घेतली.
गुडघ्यातील दुखापतीतून सावरल्यानंतर पूजाने १५ सदस्यीय संघात जागा मिळवली. एक स्विम गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून तिची ओळख आहे. मध्य प्रदेशच्या या १९ वर्षीय पूजानेआतापर्यंत ६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र, तिला एकही बळी मिळवता आलेला नाही. फलंदाजीत ८८ धावा तिच्या नावावर आहेत. असे असतानाही संघ व्यवस्थापनाने तिच्यावर विश्वास दाखवला आहे. फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
दुसरीकडे, गोव्याची शिखा पांडे हिची श्रीलंका दौºयासाठी निवड झाली होती. मात्र, या मालिकेत तिला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तिला बेंचवर बसवण्यात आले. भारताने ही मालिका ४-० जिंकली होती. इतर सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट योगदान दिले. त्यामुळे शिखाला संधी मिळाली नाही. २०१४ नंतर शिखा ही प्रथम आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौºयास मुकणार आहे. शिखाने ४० एकदिवसीय आणि ३२ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावे ५५ तर टी-२० क्रिकेटमध्ये १९ बळी आहेत. चार वर्षांच्या कालावधीत ती भारतीय महिला क्रिकेट संघाची नियमित सदस्य होती. मानसी जोशी आणि अनिरुद्ध रेड्डी या नवोदित गोलंदाजांमुळे शिखापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.