Join us  

Ravindra Jadeja: "आता तुला माझ्या परिचयाची गरज नाही कारण...", रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबासाठी खास पोस्ट 

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबासाठी एक खास पोस्ट केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 5:18 PM

Open in App

जामनगर : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या क्रिकेटपासून दूर आहे. अलीकडेच पार पडलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत त्याची पत्नी रिवाबा जडेजा हिचा विजय झाला. रिवाबा ही गुजरातच्या जामनगर उत्तर येथून भारतीय जनता पार्टीची उमेदवार होती. रिवाबा हिने मोठा विजय मिळवून आमदार होण्याचा मान पटकावला. तिच्या या विजयात पती रवींद्र जडेजाचा देखील मोलाचा वाटा आहे कारण जडेजा पत्नीच्या विजयासाठी रिंगणात उतरला होता. तो ठिकठिकाणी जाऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत होता. आता जड्डूने त्याच्या पत्नीसाठी एक खास पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

दरम्यान, रवींद्र जडेजाने ट्विटच्या माध्यमातून रिवाबा जडेजाचा एक फोटो शेअर केला आणि म्हटले, "हॅलो! आता तुला माझ्या परिचयाची गरज नाही. कारण आता तुझी स्वत:ची एक ओळख आहे. लांब पल्ला गाठायचा आहे. #mlagujarat #78NorthJamnagar." जड्डूची ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. पत्नी रिवाबा आमदार झाल्यामुळे आता तिला माझ्या परिचयाची गरज नसल्याचे रवींद्र जडेजाने म्हटले आहे. 

भाजपचा विक्रमी विजय गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने विक्रमी विजय मिळवला. भाजपने पुन्हा एकदा विक्रमी जागा मिळवत आपला बालेकिल्ला वाचवला.  या आधी 2002 मध्ये भाजपला 182 पैकी 127 जागा मिळाल्या होत्या. यावेळी हा आकडा 156 वर गेला आहे. भाजपच्या उमेदवार रिवाबा जडेजा यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आम आदमी पक्षाचे (AAP) उमेदवार करशनभाई कर्मूर यांचा 50,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. या विजयानंतर रिवाबा आणि भारतीय संघाचा क्रिकेटर रवींद्र जडेजाने रोड शो देखील केला. जनतेने दिलेले प्रेम आणि आपुलकीबद्दल जामनगरवासीयांचे त्यांनी आभार मानले. माध्यमांशी संवाद साधताना रिवाबा म्हणाल्या, "गुजरातची जनता भाजपसोबत होती आणि यापुढेही राहील." 

जडेजाने राजकारणात येण्याचे दिले होते संकेत आता रवींद्र जडेजा देखील पत्नी विधानसभेत पोहोचल्यानंतर लवकरात लवकर आपली राजकीय खेळी सुरू करू शकतो. पत्नी रिवाबा यांचा उमेदवारी अर्ज भरताना पत्रकारांशी बोलताना खुद्द रवींद्र जडेजाने राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. मला अजून 4 ते 5 वर्षे क्रिकेट खेळायचे आहे, त्यानंतर मी राजकारणातही उतरेन, असे जडेजा म्हणाला होता. रिवाबा यांची ही निवडणूक फार चर्चेत आली होती कारण त्यांना कुटुंबातीलच विरोधाचा सामना करावा लागला. पती रवींद्र जडेजा त्यांच्यासोबत निश्चितच होता, पण वहिणी नयना स्वत: या जागेवरून काँग्रेसचे तिकीट मागत होत्या. सासरे आणि वहिनी दोघेही त्यांच्या विरोधात प्रचार करत होते. मात्र अखेर रिवाबा यांनी आमदार होण्याचा मान मिळवला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :रवींद्र जडेजागुजरात विधानसभा निवडणूक 2022गुजरातआमदारजामनगर
Open in App