NZ Test squad For India Tour: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर न्यूझीलंडचा ( New Zealand Team) भारत दौऱ्यावर येणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडनं विराट कोहली अँड कंपनीला पराभवाचा धक्का दिला आणि स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आणले. त्याआधी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( WTC Final) टीम इंडियाला पराभूत केले होते. आता WTC च्या दुसऱ्या टप्प्यातील मालिकेत किवी संघाचा पाहुणचार घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडनं गुरूवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात WTC Final मधील हिरो ट्रेंट बोल्ट (Trent Boult) व अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम (Colin de Grandhomme) यांना समावेश करण्यात आलेला नाही.
भारत आणि न्यूझीलंड ( India vs New Zealand) यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला १७ नोव्हेंबरला सुरुवात होणार आहे. तीन ट्वेंटी-२० सामन्यानंतर २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. दुसरी कसोटी ३ डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. भारताची ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरी मालिका आहे. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघात फार बदल करण्यात आलेले नाहीत. पण, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या संघातील दोन खेळाडू बोल्ट व ग्रँडहोम हे बायो बबलमुळे आलेल्या थकव्यामुळे या मालिकेत खेळणार नाहीत.
कानपूर व मुंबईत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी किवींनी पाच फिरकीपटूंचा समावेश केला आहे. त्यात अजाज पटेल, मिचेल सँटनर आणि विल समरविल हे प्रमुख फिरकीपटू असतील, त्यांना बॅकअप म्हणून रचिन रविंद्र आहेच. शिवाय स्फोटक यष्टिरक्षक-फलंदाज ग्लेन फिलिप्सही संघात आहे. जलदगती गोलंदाजाची जबाबदारी टीम साऊदी, कायले जेमिन्सन आणि निल वॅगनर यांच्यावर असेल.