NZ vs AUS 2nd Test : न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातली दुसरी कसोटी आजपासून ख्राईस्टचर्च येथे सुरू झाली. केन विलियम्सन व टीम साऊदी हे २००८ मध्ये एकत्रित १९ वर्षांखालील वर्ल्ड कप खेळणारे किवी खेळाडू आज १००वा कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरले. पण, या सामन्यात भारतीय अम्पायर नितीन मेनन ( nitin menon) यांनीही वेगळा पराक्रम केला. जो रूट, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ व केन विलियम्सन यांच्या १००व्या कसोटीत मेनन अम्पायर होते. पण, आज त्यांचा एक निर्णय वादाच्या कचाट्यात सापडला आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा पहिला डाव १६२ धावांवर गडगडला. जोश हेझलवूडने ३१ धावांत ५ विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने ३, तर पॅट कमिन्स व कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. किवींकडून टॉम लॅथम ( ३८) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्यानंतर मॅट हेनरी ( २९), कर्णधार साऊदी ( २६) व टॉम ब्लंडल ( २२) यांनी झुंज दिली. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. स्टीव्ह स्मिथ ( ११) व उस्मान ख्वाजा ( १६) हे झटपट माघारी परतले. मॅट हेनरीने ३ धक्के देताना दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद १२४ अशी केली आहे.
पदार्पणवीर बेन सिअर्सने ऑसी ओपनर स्मिथला पायचीत करून मोठी विकेट मिळवली. पण, ही विकेट वादात सापडली आहे. सिअर्सने टाकलेला चेंडू मारण्यासाठी स्मिथ तिन्ही स्टम्प झाकून जरासा पुढे सरकला. चेंडू स्मिथच्या पॅडला लागल्याने जोरदार अपील झाले आणि मेनन यांनी लगेच बाद दिले. पण, रिप्लेमध्ये चेंडू ऑफ साईडचा स्टम्प मिस करत असल्याचे दिसले, परंतु अम्पायर कॉल असल्याने त्याला माघारी जावे लागले.