T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणारा संघ जिंकण्याचं प्रमाण हे १०-१ असे आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूनं लागतो, याची साऱ्यांना उत्सुकता होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच याचे नशिब फळफळले अन् त्यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या खेळपट्टीवर पहिली फलंदाजी करणे तितके सोपे नाही हे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला कळून चुकले होते. पण, तो खचला नाही, तर कॅप्टन्स इनिंग खेळून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा एक'हाती' सामना केला.
नाणेफेकीला कौल विरोधात जाऊनही न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनचं मनोबल खचलं नाही. मार्टीन गुप्तील व डॅरील मिचेल यांनी काही सुरेख फटके मारून किवींना चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण, जोश हेझलवूडनं किवींना पहिला धक्का दिला. मिचेल ( ११) बाद झाला आणि त्यानंतर न्यूझीलंडच्या धावांच्या गतीला ब्रेक लागला. न्यूझीलंडला पॉवरप्लेमध्ये १ बाद ३२ धावा करता आल्या. यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पॉवरप्लेमधील ही त्यांची सर्वात निचांक खेळी आहे. हेझलवूडनं ३ षटकांत ११ धावा देताना १ विकेट घेतली. विलियम्सनं धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, पण किवींना पहिल्या १० षटकांत ५७ धावाच करता आल्या.
केन व मार्टीन यांची जोडी डोईजड होईल असे चिन्ह दिसत असताना अॅडम झम्पानं ही जोडी तोडली. मार्टीन २८ धावांवर माघारी परतला अन् केनसह त्याची ४५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. या विकेटनंतर केननं धावांची गती वाढवली, त्यानं ग्लेन मॅक्सवेलला दोन खणखणीत षटकात खेचून ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमधील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले, तर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्धशतक करणारा तो कुमार संगकारा ( २००९ वि. पाकिस्तान) याच्यानंतर दुसरा कर्णधार ठरला. केननं एक हातानं टोलावलेला षटकार पाहून यष्टिरक्षक मॅथ्यू वेडही अवाक् झाला. केनचा झंझावात इथेच थांबला नाही, तर त्यानं १६व्या षटकात मायकेल क्लार्कला २२ धावा कुटल्या. त्यात चार चौकार व एक षटकार खेचला. केननं ६४ धावांचा पल्ला ओलांडून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही नावावर केला.