NZ vs BAN, 1st Test : न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway ) यानं २०२२ वर्षाची दणक्यात सुरूवात केली. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी कॉनवेनं शतक झळकावलं. २०२२ वर्षाच्या पहिल्याच दिवशी शतक झळकावून कॉनवेनं मोठा विक्रमही नोंदवला. डावखुऱ्या फलंदाजाचे हे कसोटी कारकीर्दितील दुसरेच शतक ठरले. घरच्या मैदानावरील हे त्याचे पहिलेच शतक आहे. याआधी लॉर्ड्सवर पदार्पणाची कसोटी खेळताना त्यानं इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. विशेष म्हणजे आज तो घरच्या मैदानावर पहिलीच कसोटी खेळला अन् परदेशात व घरच्या मैदानावर पहिल्याच कसोटीत शतक झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
मबांगलादेशविरुद्धच्या Mount Maunganui येथे सुरू असलेल्या कसोटीत कॉनवेनं १८६ चेंडूंत शतक पूर्ण केलं. कॉनवेनं ७ व्या कसोटी डावात दोन शतक आणि दोन अर्धशतक झळकावली आहेत. त्यानं २२७ चेंडूंत १२२ धावा केल्या. यापैकी ७० धावा या केवळ ( १६ चौकार व १ षटकार) चौकार-षटकरांनीच जोडल्या. कर्णधार टॉम लॅथम ( १) चौथ्याच षटकात माघारी परतल्यानंतर विल यंग व कॉनवे यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली. विल यंग १३५ चेंडूंत ५२ धावांवर माघारी परतला.