नवी दिल्ली : सध्या न्यूझीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ट्राय सीरिजचा थरार रंगला आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या सामन्यात स्पिरीट ऑफ क्रिकेटचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. ग्लेन फिलिप्सने मारलेल्या षटकारानंतर असे काही झाले जे कदाचित इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे. न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्सने विजयी षटकार खेचून किवी संघाला विजय मिळवून दिला. पण या विजयी फटक्यादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्याने ग्लेन फिलिप्सने प्रेक्षकांमध्ये धाव घेतली.
10 वर्षांच्या चिमुकलीला चेंडू लागला दरम्यान, फिलिप्सने मारलेल्या षटकारामुळे न्यूझीलंडचा विजय झाला. ग्लेन फिलिप्सने लाँग-ऑन ऑफच्या दिशेने वेगवान गोलंदाज शोरफुल इस्लामच्या गोलंदाजीवर सलग दुसरा षटकार लगावला, चेंडू स्टँडमध्ये असलेल्या 10 वर्षांच्या मुलीला लागला, ज्यामुळे ग्लेन फिलिप्स चिंतेत पडला. खरं तर ग्लेन फिलिप्सने विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी मुलीची विचारपूस करण्यासाठी स्टॅंडमध्ये धाव घेतली.
मुलगी रूग्णालयात दाखल ग्लेन फिलिप्सने धावत जाऊन बॅरिकेड ओलांडून मुलीची विचारपूस केली. डोळ्याच्या अगदी वरच्या भागाला मार लागल्याने मुलीला क्राइस्टचर्च येथील रुग्णालयात नेण्यात आले. मुलीच्या प्रकृतीशी संबंधित अधिकृत अपडेटमध्ये म्हटले आहे की, "मुलीला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते आणि आता तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ती आता आपल्या कुटुंबासह घरी गेली आहे."
तर ट्राय सीरिजबद्दल भाष्य करायचे झाले तर, पाकिस्तानकडून पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने जोरदार कमबॅक केला. पहिल्या पराभवानंतर न्यूझीलंडने त्यांच्या पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवला. आज झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा दारूण पराभव करून 9 बळी राखून मोठा विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून 130 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात किवी संघाने 16.1 षटकांत या सोप्या आव्हानाचा पाठलाग केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"