न्यूझीलंडचा स्टार बॅटर केन विलियम्सन याने क्राइस्टचर्च येथील हॅगले ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. या खेळीसह त्याने खास विक्रमाला गवसणी घातलीये. न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
कसोटीत १० हजार धावांचा टप्पा पार करण्यावर असतील नजरा
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या डावात त्याचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले होते. पहिल्या डावात ९३ धावा केल्यानंतर किवी फलंदाजाने दुसऱ्या डावात ६१ धावांची खेळी केली. केन विलियम्सनच्या आधी भारताच्या किंग कोहलीनं ९ हजार धावांचा टप्पा पार केला होता. केनच्या कामगिरीसह फॅब फोरमधील चौथ्या फलंदाजानेही आता हा मैलाचा पल्ला पार केला आहे. त्याच्या नजरा आता १० हजार धावांचा पल्ला गाठणाऱ्या क्लबमध्ये एन्ट्री करण्यावर असतील.
विराट कोहली अन् जो रुटला टाकले मागे
केन विलियम्सन याने कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा पल्ला गाठताना विराट कोहली आणि जो रुटला मागे टाकले आहे. सर्वात जलद हा टप्पा पार करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. १०३ कसोटी सामन्यातील १८२ डावात त्याने ही कामगिरी करून दाखवलीये. कुमार संगकारा आणि युनिस खान यांनी देखील १०३ कसोटी सामन्यात हा डाव साधला होता. जो रुटनं १९६ डावात तर कोहलीनं १९७ डावात हा ९ हजार धावांचा पल्ला गाठला होता.
कसोटीत सर्वात जलद ९००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्मिथ टॉपला
स्टीव्ह स्मिथ हा या यादीत अव्वलस्थानी आहे. कसोटी इतिहासातील स्मिथ एकमेव असा फलंदाज आहे ज्याने ९९ सामन्यात ९ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. ब्रायन लारानं १०१ कसोटीत हा पल्ला गाठला होता. क्रिकेट जगतात ९००० धावांचा टप्पा पूर्ण करणारा केन विलियम्सन १९ वा खेळाडू आहे. या यादीत सचिन तेंडुलकर सर्वात टॉपला आहे. त्याने कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक १५९२१ धावा केल्या आहेत. सक्रीय फलंदाजांच्या यादीत जो रुट हा एकमेव असा फलंदाज आहे ज्याच्या खात्यात कसोटीत १० हजार पेक्षा अधिक धावा आहेत. फॅब-फोरमध्ये केन विलियम्सन सर्वात शेवटी आहे. या यादीत जो रूट १२७५४ धावांसह सर्वात आघाडीवर असल्याचे दिसते. स्टीव्ह स्मिथ ९७०२ धावा आणि विराट कोहलीच्या खात्यात ९१४५ धावा आहेत.