वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्या पद्धतीनं इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले, ते कुणाच्याही पचनी पडलेलं नाही. त्यामुळेच न्यूझीलंडचा संघ उपविजेता ठरूनही क्रिकेट चाहत्यांमध्ये विजेता ठरला होता. त्यामुळेच हे संघ समोरासमोर आल्यानंतर त्या आठवणी पुन्हा आठवल्याशिवाय राहत नाहीत. पण, न्यूझीलंडच्या संघानं सोमवारी वर्ल्ड कप स्पर्धेतील त्या धक्कादायक निकालाचे उट्टे काढले आणि पहिल्या कसोटीत इंग्लंडला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. न्यूझीलंडनं डावानं विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या इंग्लंडचा पहिला डाव किवींनी 353 धावांत गुंडाळला. इंग्लंडकडून रोरी बर्न्स ( 52), जो डेन्ली ( 74), बेन स्टोक्स (91) आणि जोस बटलर (43) यांनी साजेशी खेळी केली. न्यूझीलंडच्या टीम साऊदीनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याला नील वॅगनर ( 3/90) आणि कॉलीन डी ग्रँडहोम ( 2/41) यांनी चांगली साथ दिली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं पहिल्या डावात 9 बाद 615 धावा चोपल्या. किवींची सुरुवात साजेशी झाली नाही, परंतु कर्णधार केन विलियम्सन ( 51) खिंड लढवत होता. त्यानंतरही किवी मोठी आघाडी घेणार नाही, असेच चित्र होते. पण, बी जे वॉटलिंग आणि मिचेल सँटनर यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. वॉटलिंगनं 473 चेंडूंत 24 चौकार व 1 षटकार खेचून 205 धावा केल्या, तर सँटनरनं 269 चेंडूंत 11 चौकार व 5 षटकारांसह 126 धावा चोपल्या.