वेलिंग्टन : जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत सलग ७ सामने जिंकून अपराजित राहिलेल्या भारतीय संघाला अखेर सोमवारी पहिल्या पराभवाचा धक्का बसला. फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतीय संघाला यजमान न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे १० गड्यांनी मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. त्याचवेळी, भारतीय संघाने या पराभवानंतरही स्पर्धेच्या गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखले असून न्यूझीलंडने पाचवे स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडचे आता १२० गुण झाले असून भारत अद्यापही ३६० गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे.भारतीय फलंदाजांनी खडतर स्थितीत पुन्हा एकदा लोटांगण घातले. त्यामुळे न्यूझीलंडने पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात १० गडी राखून मोठा विजय मिळवला. भारताने सकाळी दुसरा डाव ४ बाद १४४ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण भारताचा पूर्ण संघ ८१ षटकांत १९१ धावांत गारद झाला. पहिल्या डावातील कामगिरीच्या तुलनेत भारताची कामगिरी थोडी सुधारली, पण किवी संघापुढे आव्हान निर्माण करण्यास ते अपयशी ठरले. भारताने पहिला डाव १६५ धावा केल्या होत्या.टिम साऊदी (५/६१) आणि ट्रेंट बोल्ट (४/३९) यांच्या स्विंग माऱ्यापुढे भारताच्या बलाढ्य फलंदाजीला सुधारणा करण्याची गरज असल्याचे चित्र स्पष्ट झाले. न्यूझीलंडपुढे अवध्या ९ धावांचे लक्ष्य होते. त्यांनी १.४ षटकात एकही बळी न गमावता हे लक्ष्य पूर्ण केले. न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधील हा १०० वा विजय ठरला. त्याचवेळी २०१८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारताला कसोटी सामन्यात पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला.भारताला कसोटी सामन्यात अखेरचा पराभव २०१८-१९ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये पत्करावा लागला होता, पण किवींविरुद्धचा हा पराभव जिव्हारी लागणारा आहे. कारण या सामन्याआधी तुफान फॉर्ममध्ये राहिलेल्या टीम इंडियाला असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागलेला नव्हता. (वृत्तसंस्था)स्टार खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ या लढतीत प्रतिस्पर्धी संघापुढे कधीच आव्हान निर्माण करू शकला नाही. खेळपट्टीकडून तिसºया व चौथ्या गोलंदाजांना मदत मिळत होती, पण भारतीय फलंदाजांनी आपल्या खराब तंत्रामुळे बळी गमावले.हा संघ आपल्या पूर्वीच्या फलंदाजांच्या तुलनेत वेगवान गोलंदाजांना चांगल्या पद्धतीने खेळतो आणि त्यामुळे आॅस्ट्रेलियात विजय मिळवता आला, पण आव्हानात्मक स्थितीत स्विंग माºयाला सामोरा जाताना त्यांच्या उणिवा चव्हाट्यावर आल्या. केवळ मयांक अगरवालला काही प्रमाणात चांगली कामगिरी करता आली.भारताने सकाळी चार धावांच्या अंतरात अजिंक्य रहाणे (२९) व हनुमा विहारी (१५) यांना गमावले. हे दोघे संघर्षपूर्ण फलंदाजीसाठी ओळखले जातात, पण दर्जेदार वेगवान गोलंदाजीपुढे ते अपयशी ठरले.बोल्टने रहाणेला उजव्या यष्टिबाहेरचा चेंडू खेळण्यास भाग पाडले आणि तो यष्टिरक्षक वॉटलिंगकडे झेल देत माघारी परतला. त्यानंतर साऊदीच्या शानदार आऊटस्विंगवर विहारी बाद झाला. चौथ्या दिवशी पहिल्या २० मिनिटांमध्ये दोन्ही भरवशाचे फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताचा पराभव निश्चित झाला. रिषभ पंतने (४१ चेंडू, २५ धावा) योगदान दिल्यामुळे भारताला डावाने पराभव टाळण्यात यश आले. मात्र, त्याला दुसºया टोकाकडून मदत मिळाली नाही. ईशांत शर्माने १२ धावा केल्या. पंतला साऊदीने बाद केले. साऊदीने डावात पाच बळी घेतले. त्याने दहाव्यांदा अशी कामगिरी केली. त्याची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.संक्षिप्त धावफलकभारत पहिला डाव : ६८.१ षटकांत सर्वबाद १६५ धावा.न्यूझीलंड (पहिला डाव) : १००.२ षटकांत सर्वबाद ३४८ धावा.भारत (दुसरा डाव) : ८१ षटकांत सर्वबाद १९१ धावा (मयांक अगरवाल ५८, अजिंक्य रहाणे २९, रिषभ पंत २५, विराट कोहली १९, हनुमा विहारी १५; टिम साऊदी ५/६१, टेÑंट बोल्ट ४/३९.)न्यूझीलंड (दुसरा डाव) : १.४ षटकांत बिनबाद ९ धावा(टॉम लॅथम नाबाद ७, टॉम ब्लंडेल नाबाद २; ईशांत शर्मा ०/८, जसप्रीत बुमराह ०/१.)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- NZ vs IND 1st Test: वेगवान गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांचे लोटांगण
NZ vs IND 1st Test: वेगवान गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांचे लोटांगण
न्यूझीलंड १० गडी राखून विजयी; जागतिक कसोटी गुणतालिकेत टीम इंडिया अग्रस्थानी कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 1:41 AM