भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली कसोटी : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने पहिल्या डावात न्यूझीलंडच्या तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. मात्र स्वत:च्या या कामगिरीवर खुश नसल्याचे इशांत शर्माने सांगितले.
दूसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत इशांत शर्मा म्हणाला की, मी गेले दोन दिवस झोपलो नसल्यामुळे गोलंदाजी करताना आज मला थकवा जाणवत होता. मला जशी गोलंदाजी करायची होती तशी मी करु शकलो नाही असं इशांतने सांगितले.
तीन आठवड्याआधी इशांतला रणजी ट्राफीच्या सामन्यात दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर इशांतला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात संघात निवड होणार की नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र इशांतची निवड करण्यात आली. यानंतर जवळपास 24 तासांचा प्रवास करुन न्यूझीलंडमध्ये इशांत दाखल झाला होता. यामुळे इशांतला पहिल्या कसोटी सामन्यात शरीराला थकवा जाणवत होता. मात्र मी भारतीय संघासाठी काहीही करु शकतो असं इशांतने यावेळी सांगितले.
मला रणजी सामन्यात दुखापत झाल्यानंतर दुखापतीमधून सावरण्यासाठी एनसीएच्या सहाय्यक स्टाफने खूप मेहनत घेतली. तसेच दुखापत देखील खूप गंभीर असल्यामुळे मला वाटत होते की मी न्यूझीलंडविरुद्धचे कसोटी सामने खेळू शकणार नाही. मात्र मी दोन दिवस 21 षटक टाकल्यानंतर मी खेळण्याचा निर्णय घेतला. यानंतर 24 तासांचा प्रवास करुन न्यूझीलंडला यावं लागल्याने शरीरामध्ये खूप थकवा जाणवत असल्याचे इशांतने यावेळी सांगितले.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 165 धावात गुंडाळला. यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात भारतावर आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 71.1 षटकात 5 बाद 216 धावा करत 51 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून इशांत शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स पटकावल्या आहे.