भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली कसोटी : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 165 धावात गुंडाळला. यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात भारतावर आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 71.1 षटकात 5 बाद 216 धावा करत 51 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून इशांत शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स पटकावल्या आहे. मात्र न्यूझीलंडचा वेगवान आणि अनुभवी गोलंदाज टीम साऊदीने भारताचा विकेटकीपर ऋषभ पंतची विकेट भारताच्या पहिल्या डावातील कलाटणी देणारा क्षण असल्याचे सांगितले.
टीम साऊदी म्हणाला की, दूसऱ्या दिवसाच्या डावाची सुरुवात अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांना केवळ 9 धावांची भागिदारी करण्यास यश आले. ऋषभ पंत धोकादायक खेळाडू असल्यामुळे त्याची विकेट्स घेणं महत्वाचे होते. मात्र रहाणेने चुकीचा कॉल दिल्याने ऋषभ पंत 19 धावांवर धावबाद झाला. यानंतर पुढच्याच चेंडूवर अप्रतिम यॉर्कर टाकून टीम साऊदीनेआर अश्विनला त्रिफळा उडवत बाद केले होते. त्यामुळे भारताच्या पहिल्या डावात ऋषभ पंत धावबाद होणं हा कलाटणी देणारा क्षण असल्याचे टीम साऊदीने सांगितले. टीम साऊदीनं 49 धावांत 4 विकेट्स घेतल्या. तर कायले जेमिसनने देखील आपल्या पदार्पणाच्या कसोटीत भेदक मारा करत 39 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
भारताने दुसऱ्या दिवसी 5 बाद 122 धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. 132 धावांवर ऋषभ पंत धावबाद झाला. त्यानंतर आर.अश्विन शून्यावर बाद झाला. तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे 46 धावा करून माघारी परतल्याने भारताचा डाव गडबडला. यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने जोरदार फटकेबाजी करत 21 धावा केल्याने भारताला 150 धावांचा टप्पा ओलंडता आला.
भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सुरुवातीच्या 10 षटकांपर्यत सावध खेळ सुरु ठेवला होता. मात्र 11व्या षटकांत इशांत शर्माने टॉम लॅथमला ( 11) धावांवर बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर कर्णधार केन विलियम्सन आणि टॉम ब्लंडल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडचा डाव सावरला. मात्र इशांत शर्माने टॉम ब्लंडलला बाद करत न्यूझीलंडला दूसरा धक्का दिला.
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार केन विलियम्सन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागिदारी केली. ही जोडी फोडण्याचे काम इशांतनेच केले. त्याने 100वी कसोटी खेळणाऱ्या टेलरला 44 धावांवर बाद केले. रॉस माघारी परतल्यानंतर केननं न्यूझीलंडची घोडदौड सक्षमपणे सांभाळली होती. परंतु, एक चुकीचा फटका आणि त्याला विकेट फेकावी लागली. 63व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर केन झेलबाद झाला. रवींद्र जडेजानं त्याचा झेल टिपला. केननं 153 चेंडूंत 11 चौकारांसह 89 धावा केल्या.
केन आणि रॉस ही अनुभवी जोडी माघारी परतल्यानंतर बीजे वॉटलिंग आणि हेन्री निकोल्स यांच्या खांद्यावर जबाबदारी होती. पण, या जोडीला फार कमाल करता आली नाही. आर अश्विनच्या गोलंदाजीवर हेन्री निकोल्स ( 17) स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या हाती झेल देऊन माघारी परतला. खराब विद्युतप्रकाशामुळे 5 बाद 216 धावांवर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.